पराभवाच्या छायेत राष्ट्रवादीला शिवाजी महाराजांची आठवण! : मस्के

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षातील अनेक बडे नेते सध्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. कारण त्यांना कळून चुकले आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार स्वप्नातही सत्तेत येऊ शकत नाही. गावच्या सरपंचापासून ते आमदार, खासदारापर्यंत सर्वजण भाजपमध्ये प्रवेश करण्यसाठी एका पायावर रांगेत उभे आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात पोटसुळ उठणे स्वाभाविकच आहे. कारण अजित पवार यांना आता चांगलेच कळून चुकले आहे की, काहीही झाले तरी राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही व आपण काही मुख्यमंत्री होणार नाहीत. जेव्हा सत्ताधाऱ्यांवर टिका करण्यासाठी काहीच उरले नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील जनतेला भावनिक करण्यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत, विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली. त्यामुळेच अजित पवार यांनी नुकतीच घोषणा केली की, यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक नव्हे तर दोन झेंडे असतील. दुसरा झेंडा हा भगवा असून त्यावर शिवाजी महाराजांची आकृती असेल. हा सर्व प्रकार म्हणजे भावनेचे राजकारण करण्याचा प्रयत्न असल्याचे मत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा भाजपाचे नेते राजेंद्र मस्के यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.