ठिकठिकाणी रस्त्यांना भगदाडे; हौशी पर्यटकांची संख्या घटली, मुरुडचा पर्यटन व्यवसाय ‘खड्डय़ा’त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शनिवार-रविवार हे सुट्टीचे दोन दिवस मजेत घालविण्यासाठी अनेकांचे आवडते डेस्टिनेशन म्हणजे मुरुडचा समुद्रकिनारा. फेसाळणाऱया लाटय़ा, समुद्राचा खारा वारा अनुभवण्यासाठी अनेकजण येथे येत असतात. पण मुरुडच्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे असल्याने पर्यटकांची संख्या घटली आहे. येथील पर्यटन व्यवसाय जणू ‘खड्डय़ा’त गेला असून त्याचा हॉटेलच्या बुकिंगवर तसेच स्थानिकांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. वाहनचालकांचे तर कंबरडे मोडले असून मुरुड, अलिबाग नको रे बाबा, असे म्हणत अनेक खासगी चालक येथे येण्यास खड्डय़ांमुळे नकार देत आहेत.

मुरुडचा समुद्रकिनारा पाहण्यासाठी तसेच येथील नवाबी राजवाडा, जंजिरा किल्ला, दत्तमंदिर, गारंबी ही स्थळे बघायलाही मोठी गर्दी होत असते. मुंबईसह पुणे, ठाणे, जळगाव, धुळे, पालघर अशा विविध ठिकाणांहून पर्यटक कारने येतात. पण सध्या काशीद, नांदगाव, दांडा, विहूर, मजगाव येथील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर रस्ते आहे. तर प्रत्यक्ष मुरुडमधील पेठ-मोहोल्ला रस्ता, बाजारपेठ-कासारआळी रस्ता, मासळी मार्केटला जाणारा रस्ता हा संपूर्ण परिसर खड्डेमय झाला आहे. त्यामुळे कारबरोबरच दुचाकी चालकांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे.

स्थानिकांचा रोजगार कमी झाला

पर्यटक येथे आले की, दोन-तीन दिवस स्थानिक हॉटेलांमध्ये मुक्काम करतात. येथे एकूण 80 हॉटेल्स असून त्यापैकी 62 हॉटेल्स मुरुडच्या समुद्रकिनाऱयालगत आहेत. पण खड्डय़ांच्या विघ्नामुळे पर्यटकांचे येण्याचे प्रमाण घटल्याने त्याचा हॉटेल बुकिंगवर परिणाम झाला आहे. तर पर्यटकांवर अवलंबून असलेल्या स्थानिकांनादेखील रोजगार मिळणे कठीण झाले आहे.

पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास

बाप्पाच्या आगमनाला थोडेच दिवस उरले असताना असंख्य मुरुडकर पाठदुखी व कंबरदुखीने त्रस्त झाले आहेत. शहरात ठिकठिकाणी खड्डे पडल्याने त्यातून प्रवास करताना कोणत्याही क्षणी अपघात होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या खड्डेमय प्रवासामुळे मुरुडकरांना रस्त्यावरून चालणेही मुश्कील झाले असून लवकरच खड्डे बुजविण्यास सुरुवात होईल, असे मुरुड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी सांगितले.