
श्री औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी चौथ्या श्रावण सोमवारी महाराष्ट्रासह अन्य राज्यातून भाविक मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले होते. दिवसभरात 2 लाखांच्यावर भाविकांनी दर्शन घेतले. हिंगोली व अन्य ठिकाणाहून हजारो भाविकांनी पायी चालत येऊन दर्शन घेत पूजा केली. हरहर महादेव नागनाथ महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे स्थान असलेले देवस्थान म्हणुन औंढा येथील श्री नागनाथ मंदिराची देशभरात ख्याती आहे. श्रावण महिन्यांमधील चौथ्या श्रावणी सोमवारी लाखो भाविकांनी श्री नागनाथाच्या दर्शनासाठी गर्दी केली. श्री नागनाथ प्रभुस जवसाची शिवमूठ आहे. बिल्वपत्र वाहून, रुद्राभिषेकासह इतर धार्मिक विधीही भाविकांनी केले. शोवटचा श्रावणी सोमवार असल्याने रात्री दोन वाजता मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. वकील संघाचे अध्यक्ष अॅड. बापुराव बांगर, संस्थानचे सल्लागार शिवाजीराव देशपांडे यांच्यासह अन्य मान्यवरांनी महापुजा केल्यावर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. हर हर महादेव, ओम नम शिवाय, शिवशंभोच्या गजरामध्ये भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. माजी आमदार गजाननराव घुगे, माजी नगराध्यक्षा जया अनिल देशमुख, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष शरद पाटील, दिपाली पाटील, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांच्यासह अन्य मान्यवरांनी देखील पूजा केली. भारत स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविले. हिंगोली, औंढा नागनाथ, मेथा, वसई, पुरजळ, दुधाळा, येथील विद्यार्थी या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते. यासोबतच हिंगोलीतील जलेश्वर महादेव मंदिर, डोंगरकडा येथील जटाशंकर मंदिर, पोत्रा येथील पवित्रेश्वर मंदिर, केलसुला येथील महादेव मंदिर, चिंचोली येथील महादेव मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.























































