सोने 40 हजारांवर, चांदीही तेजीत! सणासुदीच्या दिवसांत विक्रमी दरवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. मुंबई, जयपूरसह अनेक शहरांमध्ये प्रतिदहा ग्रॅमसाठी (एक तोळा) सोने 40 हजारांवर पोहचले आहे. चांदीही तेजीत असून प्रतिकिलो 47 हजारांवर गेली आहे.

गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत सोन्याच्या दरामध्ये 700 ते एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत गेल्या आठवडय़ात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 38,770 रुपये होता. सोमवारी हाच दर 40,040 रुपयांवर गेला आहे. दिल्लीत सोने 39,810 रुपयांवर गेले आहे. सोन्याप्रमाणे चांदीच्या दरामध्येही मोठी वाढ झाली. मुंबईत चांदी 45,015 रुपयांवरून 46,380 रुपये प्रतिकिलो झाली.

रिझर्व्ह बँकेकडून सरकारला 1.76 लाख कोटी

मंदीमुळे डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्याची चिन्हे आहेत. रिझर्व्ह बँकेने आपल्या तिजोरीतील तब्बल 1.76 लाख कोटींचा अतिरिक्त निधी केंद्र सरकारला देण्याचा निर्णय सोमवारी घेतला. सरकारने गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेशी चर्चा करून अतिरिक्त निधीविषयी निर्णय घेण्यासाठी माजी गव्हर्नर बिमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली होती. या उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारशींचा स्वीकार करत बँकेच्या बोर्डाने आपल्या तिजोरीतील तब्बल 1.76 लाख कोटी इतका अतिरिक्त निधी सरकारला देण्यास मान्यता दिली आहे. ही रक्कम देशाच्या विकासासाठी वापरण्याबाबत सरकार आग्रही आहे.

आठ महिन्यांत 20 टक्के दरवाढ
हिंदुस्थानात या वर्षी गेल्या आठ महिन्यांत सोन्याच्या दरामध्ये 20 टक्के दरवाढ झाली आहे. आगामी काळात दिवाळीपर्यंत सोन्याचे दर आणखी वाढतील असा अंदाज आहे.