‘370’चा प्रचार देशभरात करणार! भाजपचा महिनाभर कार्यक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम आणि 35 ए कलम रद्द करून नरेंद्र मोदी सरकारने इतिहास रचला असला तरी, या कलमाबाबत विरोधकांकडून होत असलेला अपप्रचार रोखण्यासाठी तसेच, या कलमाच्या प्रचारातून जनजागृती करत मतांची बेगमी करण्यासाठी भाजपाने एक अजेंडाच आज जाहीर केला.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान व जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी आज या कार्यक्रमाची भाजपा मुख्यालयात घोषणा केली. 370 वे कलम रद्द केल्यानंतर देशभरात समाधानाचे वातावरण असले आणि देशावरचा एक कलंक नाहीसा झाल्याची भावना जनसामान्यांमध्ये असली तरी, विरोधी पक्ष व विशेषतः काँग्रेसकडून सरकारच्या निर्णयाला विरोध होत असून, सरकारने दडपशाहीने जम्मू-कश्मीरची गळचेपी केल्याचा आरोप केला जात आहे. एकीकडे जागतिक मंदी आणि हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेचे दिवाळे निघालेले असताना, महाराष्ट्रासह हरयाणा व गुजरातमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत अर्थव्यवस्थेच्या दयनीय अवस्थेमुळे भाजपाला फटका बसू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर रामबाण इलाज म्हणून 370 वे कलम रद्द करून मोदी सरकारने इतिहास घडवला, ही राष्ट्रप्रेमाची भावना जनतेच्या मनावर बिंबवण्याचे नियोजन भाजपाने केले आहे.

1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या महिनाभराच्या कालावधीत ही जनजागृती मोहीम चालणार असल्याची माहिती, धमेंद्र प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. जम्मू-कश्मीरमधील चार ठिकाणांसह या मोहिमेसाठी देशभरात नऊ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. देशभरातील 35 मोठय़ा शहरांमध्ये तसेच 370 लहान शहरांमध्ये मोदी सरकारच्या या र्न्णियाची माहिती देणारी जनजागृती मोहिम राबविली जाणार आहे. भाजपा नेते आणि पदाधिकाऱयांसह केंद्र व राज्य सरकारामधले भाजपाचे मंत्री आणि खासदार या जनजागृती मोहिमेत भाग घेणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

370 कलम हटवायला 69 वर्षे लागली; विरोधकांनी थोडा धीर धरावा!
लखनौ – जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवायला केंद्र सरकारला 69 वर्षे लागली. त्यामुळे तणावग्रस्त झालेली कश्मीरची परिस्थिती पूर्ववत व्हायला थोडा वेळ लागेल. सर्वोच्च न्यायालयानेही हेच सांगितले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कश्मीरमध्ये जाण्याचा हट्ट सोडावा आणि धीर धरावा, असा सल्ला बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी विरोधी पक्षांना दिला आहे.

बहुजन समाज पक्षाने 370 कलम हटवण्याचे समर्थन केले होते. त्या म्हणाल्या, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही देशाच्या समता, समानता आणि अखंडतेला सर्वोच्च स्थान दिले. आम्हीही त्याच मार्गाने जाणार आहोत. विरोधी पक्षांनी कश्मीरमध्ये जाण्याचा हट्ट सोडावा. अशाने केंद्र सरकार आणि राज्यपाल सत्यपाल मलिक यांना राजकारण करण्याची संधी मिळते, असा टोला बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी काँग्रेसला मारला आहे.