विरोधकांच्या सोंगा-ढोंगाला बळी पडू नका; जयदत्त क्षीरसागर यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाळवंडी नाका, तेलगाव नाका आणि बार्शी नाका परिसराच्या विकासासाठी 9 कोटी रूपये मंजूर झाले असून हद्दवाढीसाठी 2 कोटी, तेलगाव फाटा ते जवळा रस्ता 3 कोटी रूपये व प्रस्तावीत असलेल्या नाळवंडी फाटा ते नाळवंडी या रस्त्यासाठी 4 कोटी रूपये मंजूर झाले असून विरोधकांच्या अपप्रचार व सोंगा-ढोंगाला बळी पडू नका असे आवाहन राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे. प्रभाग क्रमांक19 मधील सिमेंट रस्ता, नाली बांधकामाचा शुभारंभ जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

क्षीरसागर म्हणाले की, नाळवंडी नाका परिसर हा गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. या भागाच्या विकासासाठी सातत्याने लक्ष देऊन आपण कामे केली आहेत. मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रय्तन केल्याने या भागाच्या हद्दवाढीतील वस्तीसाठी 2 कोटी रूपये निधी मंजूर झाला आहे तसेच तेलगाव फाटा ते जवळा रस्ता हा देखील लवकरच पूर्ण होणार असून यासाठी 3 कोटी रूपये मंजूर आहेत. नाळवंडी फाटा ते नाळवंडी हा रस्ता व्हावा यासाठी 4 कोटी रूपये मंजूर झाले असून लवकरच याची निवीदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. पुढचा काळ आपलाच आहे फक्त भक्कमपणे पाठीशी रहा. विरोधकांनी 5 वर्षात कुठले उद्योग केले, काय दिवे लावले हे त्यांना विचारा. घुडघ्याला बाशींग बांधून बसणारे सोंगं-ढोंगं करीत आता दरवाजात येतील तेव्हा आधी विकासाचे बोला आणि मग मताचे बोला, असे त्यांना सांगा. विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडता या परिसरातून नक्कीच भरभरून पाठींबा मिळेल अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी डॉ.भारतभूषण क्षीरसागर, ज्येष्ठ नेते अमृत सारडा, युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर, गणपत डोईफोडे, नितीन धांडे, न.से. विकास जोगदंड, संतोष गायकवाड, अमोल पवळ, गणेश वाघमारे, सागर बहीर, जयदत्त थोटे, जिलानी बागवान, जयदत्त थोटे, सागर बहीर, सुनिल सुरवसे, विलास विधाते, विनोद मुळूक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, हा परिसर गोरगरीब आणि कष्टकर्‍यांचा आहे त्यामुळे या भागाचा विकास करण्यासाठी आपण रस्ते, नाल्या आणि पाण्याचा प्रश्‍न पूर्ण करण्यासाठी सातत्याने संपर्कात रहात असतो. हा भाग गायरान जमिनीचा होता. त्यामुळे येथील नागरीकांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी निधी उपलब्ध करून ही कामे सुरू केली आहेत. आम्ही सर्वसामान्य लोकांच्या समस्यांना प्राधान्य देणारे आहोत म्हणूनच या भागातून विक्रमी मतदान आमच्या पाठीशी उभे असते, असे ते म्हणाले.