
तोटय़ात असलेल्या बेस्ट उपक्रमाला सावरण्यासाठी हरतऱहेचे उपाय योजून त्याला बळ देण्याचे प्रयत्न एकीकडे सुरू असताना बेस्ट वर्कर्स युनियनचे नेते शशांक राव यांनी उपोषणाचे हत्यार उगारले आहे. त्यामुळे गणपतीचा सण तोंडावर आला असताना मुंबईकरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. वाढत्या महागाईत मुंबईकरांना बेस्टने स्वस्तात मस्त प्रवासाची भेट दिल्यानंतर एकीकडे बेस्ट प्रवासी वाढले. मात्र वेतन करारावरून युनियन वारंवार संपाची धमकी देत आहे. 2016पासून रखडलेल्या वेतन करारावर सर्वच संघटनांशी बेस्ट प्रशासनाची बोलणी सुरू असताना राव यांनी वेतन करार करा नाहीतर संप करू, असा धोशा लावला आहे.
रखडलेला वेतन करार, अर्थसंकल्पाचे विलीनीकरण, दिवाळी बोनस आणि इतर प्रलंबित मागण्यांवर बेस्ट प्रशासनाशी गेले काही दिवस वाटाघाटी करणाऱ्या बेस्ट संयुक्त कृती समितीने अचानक मंगळवारी रात्री बेस्टच्या वडाळा आगारात बेमुदत उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकीकडे गणेशोत्सवात बेस्टला जादा प्रवासी मिळण्याची शक्यता असताना प्रवाशांना वेठीस धरण्यासाठी बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव हे संपावरून किती दिवस तळ्यात-मळ्यात करून प्रवाशांना छळणार, असा सवाल केला जात आहे.
बेस्ट वर्कर्स युनियनने बेस्ट प्रशासन वेतन करारावर सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचा आरोप करीत शनिवारी संपासंदर्भात कामगारांचे थेट मतदान घेतले. बहुतेक सर्व कामगारांचा या संपाला पाठिंबा असल्याचा दावा बेस्ट संयुक्त कृती समितीचे नेते शशांक राव यांनी केला आहे.
सोमवारी वडाळा डेपोसमोर बेस्ट कामगारांनी धरणे आंदोलन केले. बेस्ट प्रशासन वेतन करारास विलंब लावत असून सरकार कामगारांचा अंत पाहत असल्याचा आरोप करीत राव यांनी मंगळवारी रात्री वडाळा बेस्ट आगारात बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करीत असल्याचे जाहीर केले आहे.

























































