जनता जनार्दनाच्या दर्शनासाठीच ही महाजनादेश यात्रा- मुख्यमंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात काढण्यात आलेली महाजनादेश यात्रा ही कोणत्या देवतांच्या दर्शनासाठी नसून निवडून दिलेल्या जनतेचे आशिर्वाद माणून त्यांचा जनादेश घेण्यासाठी व गेल्या चार वर्षात केलेल्या कामाचा लेखा-जोखा मांडण्यासाठीच आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेलू येथील महाजनादेश यात्रेच्या निमित्त आयोजित विराट सभेत केले.

यावेळी व्यासपीठावर पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, यात्राप्रमुख सुजितसिंग ठाकूर, भाऊराव देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विठ्ठलराव रबदडे, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, तालुका अध्यक्ष संजय साडेगावकर, समीर दुधगावकर, खंडेराव आघाव, माधवराव सानप, बाजार समितीचे सभापती रवींद्र डासाळकर, युवानेत्या मेघना बोर्डीकर (साकोरे), डॉ. ऋतुराज साडेगावकर, जयप्रकाश बिहाणी, नंदकुमार बाहेती आदींची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पणकरून सभेची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत युवानेत्या मेघना बोर्डीकर म्हणाल्या. बऱ्याच वर्षानंतर देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून व महाराष्ट्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून खंबीर नेतृत्व लाभले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या जनकल्याण योजना तळागाळापर्यंत पोहचल्यामुळे जनता समाधानी आहे. आत्तापर्यंत मराठवाड्याने किती तरी मुख्यमंत्री दिले, परंतु मराठवाडा मात्र विकासापासून कोसो दूर राहिला. परंतु मुख्यमंत्री फडवणीस यांच्या निर्णयामुळे मराठवाड्याच्या प्रगतीला निश्चितच हातभार लागणार आहे. तालुक्यातील लोअर दुधाना प्रकल्पाचे अर्धवट कामे पूर्ण करावीत, जायकवाडीचे पाणी लोअर दुधनापर्यंत आणावे, 332 केव्हीची उभारणी करावी व शेतीपुरक व्यवसायाची उभारणी करून शेतकऱ्यांना समृद्ध करावे, अशा मागण्या यावेळी मेघना बोर्डीकर यांनी मांडल्या. भविष्यात जिंतूर-सेलू मतदार संघ राष्ट्रवादी मुक्त करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, प्रत्येक यात्रा ही कोणत्या तरी दैवताच्या दर्शनासाठीच असते. परंतु ही महाजनादेश यात्रा मात्र केवळ जनता जनार्दनाच्या दर्शनासाठीच आहे. भविष्यात आपण कोकणातील समुद्रात जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यांमधून संपूर्ण मराठवाड्यात पोहचून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मराठवाड्यात 64 हजार कि.मी.च्या पाईपलाईनद्वारे सर्व धरणे एकमेकांना जोडण्याचे काम चालू असून भविष्यात कोणतेच धरण कोरडे न राहता एकाही गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही. कर्जमाफी योजनेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होत नाही, तोपर्यंत ही योजना बंद केली जाणार नाही. लोकसभेत विरोधी पक्षनेता निवडी ऐवढे देखील खासदार काँग्रेसला निवडणून आणता आले नाहीत. याचे खापर ते ईव्हीएम. मशीनवर फोडत आहेत. परंतु मतदारांच्या मनात पंतप्रधान मोदी असल्यामुळे त्यांनी कमळ या चिन्हाचे बटन दाबले. बिघाड हा इव्हिएम मशीनमध्ये नसून काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांच्या डोक्यात आहे. त्यांच्या पंधरा वर्षाची तुलना महायुच्या पाच वर्षाशी केली तर निश्चितच पाच वर्षात कितीतरी पटीने जास्त कामे झाली आहेत.

गोरगरीब शेतकऱ्यांना अतिवृष्टी, दुष्काळ अनुदान, बोंडअळी या माध्यमातून महायुतीने नेहमीच मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच विकासात्मक कामे करताना प्रधानमंत्री सडक योजनेतून 30 हजार कि.मी.चे महामार्ग तर 10 हजार कि.मी. रस्त्याचे कामे चालू आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रत्येकाला घर देण्याचा संकल्प देखील हाती घेतला आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी महिला बचतगटांना शासनाच्या वतीने बिनव्याजी कर्जवाटप देखील करण्यात येते. या सर्वबाबीसाठी कर्जाची आपल्याला चिंता नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी सारखे खंबीर नेतृत्व पाठीशी आहे. शासनाने प्रत्येकाला घर, वीज, गॅस कनेक्शन तसेच शौचालय या सुविधा पुरविल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला हे सरकार आपलेच सरकार आहे, अशी भावना निर्माण झाली आहे. शिक्षण क्षेत्रात देखील भरीव प्रगती करण्यात आली असून देशात 18 व्या क्रमांकावर असलेले महाराष्ट्र सध्या तिसऱ्या क्रमांकावर आले आहे व लवकरच पहिल्या क्रमांकावर जाईल, अशी शाश्वती देखील त्यांनी यावेळी दिली. भाजपा युवानेत्या मेघना बोर्डीकर यांनी त्यांच्याकडे आलेल्या शेकडो मागण्यांच्या निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी मेघनाताई यांनी अधिकृतरित्या विधानसभेत येऊनच या मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, असे म्हणून त्यांच्या उमेदवारी बाबत सूतोवाच केले.

यावेळी बोलताना पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर म्हणाले, जिल्ह्यात प्रथमच 4 हजार 500 कोटी रुपयांचा पीक विमा देणारा व 1 हजार कोटीची कर्जमाफी देणारा हा पहिलाच मुख्यमंत्री आहे. काँग्रेसने 50 वर्ष सत्ता भोगून शेतकऱ्यांना लुटण्याचे पाप केले आहे. कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे दुसरा भगीरथच आहे, असेही त्यांनी यावेळी बोलून दाखविले. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या काळात मुख्यमंत्री व सर्व प्रमुख मंत्रीपदी मराठा असताना त्यांनी फक्त मराठ्यांना फक्त आत्महत्याच दिल्या. परंतु मराठ्यांना न्याय देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकमेव आहे. याचाच परिणाम परिभणी जिल्ह्यातील चारही जागेवर निश्चितच महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास लोणीकर यांनी बालून दाखविला. यावेळी बोलताना माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी स्पष्ट केले की, विधानसभेवर निश्चित महायुतीची सत्ता येणार ही काळ्या दगडावरील रेष आहे. त्यामुळे आपला मतदार संघ देखील त्याच्यात सहभागी झाला पाहिजे, यासाठी सर्वांनी आत्तापासूनच कामाला लागावे, राज्यातील ग्रामीण भागातील जनतेने मुलभूत सुविधा देण्यासाठी व विकासात्मक कामाठी भाजपा पक्ष नेहमीच प्रयत्नशील असतो. त्यासाठी आपणही आपल्या मतदार संघाचा विकासाचा असमतोल दूर करण्यासाठी आपणही पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन केले.

या महाजनादेश यात्रेच्या सभेसाठी शहर तसेच ग्रामीण भागातून हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. महिलावर्गाची उपस्थिती लक्षणिय ठरत होती. सर्वत्र झेंडे व बॅनर लावल्या गेल्याने संपूर्ण शहरच भाजपमय झाल्याचे दिसत होते. सभेच्या ठिकाणी गर्दी लक्षात घेता, गैरसोय होऊ नये म्हणून जिंतूर नाक्यावर मोठी स्क्रीन प्रेक्षकांच्या सोयीसाठी लावण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुभाष मोहकरे यांनी केले.