बदलापुरमध्ये आंबेडकरी विचारवंतांचा परिसंवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दलित पँथरचे संस्थापक आणि बंडखोर साहित्यिक विचारवंत राजा ढाले यांना आदरांजली वाहण्यासाठी बदलापूर येथील आंबेडकरवादी पक्ष, संघटना, संस्थांनी संयुक्तरीत्या येत्या रविवारी 1 सप्टेंबर रोजी आगळय़ावेगळय़ा परिसंवादाचे आयोजन केले आहे. त्यात एकाच व्यासपीठावर निरनिराळय़ा स्वतंत्र विषयावर नामवंत बोलणार आहेत, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचातर्फे त्या कार्यक्रमाचे निमंत्रक अरुण केदारे आणि महेंद्र नवगिरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
हा परिसंवाद संध्याकाळी 6 वाजता बदलापूर (पश्चिम) येथील नीळकंठ हॉल, वैशाली सिनेमामागे पार पडणार आहे. त्यात रिपाइं (सेक्युलर)चे अध्यक्ष श्यामदादा गायकवाड (आंबेडकरी समाजापुढील आव्हाने), रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश सावंत (राजा ढाले ः अष्टपैलू व्यक्तिमत्त्व), प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे (दलित पँथरचा कार्यकाळ), ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ (दलित पँथर आणि पत्रकारिता), सयाजी वाघमारे (राजा ढाले यांचे बुद्ध धम्मावरील विचार) हे विचारवंत वक्ते आहेत. राजा ढाले यांच्या या श्रद्धांजलीपर कार्यक्रमात रिपाइं, भारिप-बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, डॉ. आंबेडकर स्मारक समिती बदलापूर आदी संस्था-संघटनांचा सक्रिय सहभाग आहे.