अयोध्येतील जागेवर मंदिरच उभारले पाहिजे, शिया मुस्लिमांचा सुप्रीम कोर्टात निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court

अयोध्येतील वादग्रस्त जागेवर मंदिरच उभारले पाहिजे, ही जागा मंदिर उभारण्यासाठी हिंदूंना दिली पाहिजे असा निर्धार शिया वक्फ बोर्डाने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयापुढे केला. यावेळी अयोध्येतच रामजन्मभूमी आहे या हिंदू महासभेच्या युक्तिवादालाही पाठिंबा दिला. शिया मुस्लिमांच्या युक्तिवादामुळे अयोध्येतील जागेवर पोकळ दावा करणारे सुन्नी वक्फ बोर्ड तोंडावर आपटले आहे.

अयोध्या प्रकरणाचा निकाल देताना इलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त जागेचा एकतृतीयांश भाग मुस्लिमांना दिला होता, सुन्नी वक्फ बोर्डाला नाही. त्यामुळे या जागेवर आमचा हक्क बनतो. याच हक्कापोटी आम्ही ही जागा हिंदूंना मंदिर उभारण्यासाठी देत आहोत, असे शिया वक्फ बोर्डाचे वकील एम. सी. धिंग्रा यांनी न्यायालयाला सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे शुक्रवारी 16 व्या दिवसाची सुनावणी झाली. सुरुवातीला राममंदिर पुनरुद्धार समितीच्या वतीने ऍड. पी. एन. मिश्रा यांनी, तर हिंदू महासभेच्या वतीने हरिशंकर जैन यांनी बाजू मांडली. या दोघांचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर ऍड. धिंग्रा यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. त्यांनी हिंदू महासभेच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादावर आमचा आक्षेप नसल्याचे सांगितले.

हिंदूंचा रामजन्मभूमीवर सुरुवातीपासूनच अधिकार
शुक्रवारी हिंदू महासभेच्या वतीने ऍड. हरिशंकर जैन यांनी बाजू मांडली. अयोध्येत रामजन्मभूमी असून हिंदू सुरुवातीपासूनच तेथे पूजा करताहेत. किंबहुना या जागेवर हिंदूंचा सुरुवातीपासूनच अधिकार आहे. संविधान लागू झाल्यानंतर ही जागा हिंदूंना मिळायला हवी होती. संविधानाच्या मूळ प्रतीच्या तिसऱया उपच्छेदामध्ये प्रभू रामचंद्रांची प्रतिमा आहे. प्रभू रामचंद्र संवैधानिक पुरुषसुद्धा होते. त्यांचा जन्म अयोध्येच्या महालात झाला होता. सर्व ग्रंथ हेच सत्य सांगतात, असा युक्तिवाद ऍड. जैन यांनी केला.

‘ती’ वास्तू हिंदूंच्याच ताब्यात होती
बाबरचे वंशज एखाद्या वास्तूचे मालक होऊ शकतात, परंतु ती वास्तू मशीद असू शकत नाही. हिंदू कित्येक शतकांपासून अयोध्येत पूजा करताहेत. मुस्लिमांचा या जागेवर कधीच ताबा नव्हता. ही वास्तू हिंदूंच्याच ताब्यात होती. मुस्लिम राज्यकर्ते असल्यामुळे या ठिकाणी जबरदस्तीने नमाज अदा केला जात होता. 1856 पूर्वी या ठिकाणी कधीच नमाज अदा केला गेला नव्हता. 1934 पर्यंत केवळ शुक्रवारी नमाज केले जायचे, असे राममंदिर पुनरुद्धार समितीच्या ऍड. मिश्रा यांनी सांगितले.

सुन्नी वक्फ बोर्डाच्या वकिलाला धमकी
अयोध्या प्रकरणात सुन्नी वक्फ बोर्डाची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील राजीव धवन यांनी माजी सरकारी अधिकाऱयाविरोधात न्यायालयाकडे तक्रार केली आहे. न्यायालयात मुस्लिम पक्षकारांची बाजू मांडत असल्यामुळे मला सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी प्रा. एन. षण्मुगम यांनी पत्राद्वारे धमकी दिली आहे. त्याचबरोबर घर आणि न्यायालयाच्या आवारात काही लोक मला दमदाटीही करतात, असे धवन यांनी तक्रारीत म्हटले आहे.