एमबीबीएसच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मागासवर्गीय बनवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन इच्छिणाऱया विद्यार्थ्यांना मागासवर्गीय जातीची बनावट वैधता प्रमाणपत्र बनवून देऊन वैद्यकीय महाविद्यालय आणि शासनाची फसवणूक करणारा भामटा डॉक्टर गुन्हे शाखेच्या हाती लागला. डॉ. अब्दुल वहाब हाजी दाऊद मिर्झा असे त्याचे नाव असून गुप्तवार्ता विभागाच्या पथकाने मध्य प्रदेशातील एका रुग्णालयात जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या.

‘टीबी ऍण्ड चेस्ट’ विषयातील तज्ञ म्हणून डॉ. मिर्झा हा काम करीत होता. जे विद्यार्थी एमबीबीएसच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन इच्छितात, पण त्यांना ऍडमिशन मिळणे कठीण आहे अशांना डॉ. मिर्झा हेरायचा. मग त्यांना मागासवर्गीय जातीची बनावट जात प्रमाणपत्र बनवून द्यायचा. त्याचा माग काढत असताना डॉ. मिर्झा मध्य प्रदेशच्या इंदूर येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक विनय घोरपडे, सपोनि रियाझ काझी, अंमलदार साहेबराव पवार, विलास शिंदे व गावंड या पथकाने इंदूर गाठून वैद्यकीय महाविद्यालय व शासनाची फसवणूक करणाऱया मिर्झाला पकडून आणले.

बाप-लेकाचे नाटक यशस्वी ठरले
इंदूरच्या इंडेक्स मेडिकल कॉलेजमध्ये डॉ. मिर्झा असल्याची खबर मिळताच पोलीस पथक तेथे धडकले. पोलिसांनी कॉलेजमध्ये शोधाशोध केली, पण मिर्झाचा थांगपत्ता लागला नाही. त्यावेळी एपीआय काझी यांनी शक्कल लढवली. ते अंमलदार साहेबराव पवार यांचा मुलगा बनले आणि दोघे बाप- लेक रुग्णालयात गेले. मुलाला छातीचा संसर्ग झाल्याचे सांगून तज्ञांकडून उपचार करायचे असल्याचे पवार यांनी तेथील एका नर्सला सांगितले. नर्सने लगेच डॉ. मिर्झाला संपर्क साधून त्याला बोलावून घेतले. मिर्झा तेथे येताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

अनेक ठिकाणी गुन्हे
डॉ. मिर्झा हा बनावट जातीचे प्रमाणपत्र देणारा सराईत आरोपी असून त्याच्याविरोधात जे. जे. मार्ग, भोईवाडा, खेरवाडी, शीव, नागपाडा, आग्रीपाडा तसेच धुळ्यातले चाळीसगाव पोलीस ठाणे, कोल्हापूरमधील लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे शिवय सीबीआय पोलीस ठाण्यातदेखील गुन्हे दाखल आहेत.