
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा कश्मीरच्या मुद्दय़ावरून जळफळाट सुरूच आहे. गेले काही दिवस हिंदुस्थानला पोकळ धमक्या देणाऱया इम्रान यांनी शुक्रवारी पुन्हा इस्लामिक कार्ड बाहेर काढत संयुक्त राष्ट्रावर आगपाखड केली. मुस्लिमांवर अत्याचार होत असताना संयुक्त राष्ट्र गप्प का? कश्मीरमध्ये मुस्लिम नसते तर जगभर आरडाओरड झाली असती, असे विधान त्यांनी केले.
संयुक्त राष्ट्र हिंदूंनाच झुकते माप देते आणि मुस्लिमांच्या बाबतीत पक्षपाती वागते. मुस्लिमांवरचे अत्याचार संयुक्त राष्ट्राला दिसत नाहीत का, अशा शब्दांत इम्रान खान संयुक्त राष्ट्राच्या भूमिकेवर बरळले. संयुक्त राष्ट्राच्या वार्षिक सभेमध्ये कश्मीरबाबत आवाज उठवणार असल्याचे सांगतानाच इम्रान यांनी जर आजच्या घडीला जग कश्मिरींसाठी उभे राहिले नाही तर याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील, अशी पोकळ धमकी पुन्हा दिली.
पाकिस्तानने पाळला ‘कश्मीर अवर’
जम्मू-कश्मीरच्या नागरिकांबाबत प्रचंड पुळका असलेल्या पाकिस्तानने शुक्रवारी ‘कश्मीर अवर’ पाळला. आमचे कश्मिरी संकटात आहेत. जवळपास आठ लाख लोक गेले चार आठवडे संचारबंदीत अडकलेत, आपण शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहूया, असे आवाहन इम्रान यांनी केले.




























































