
> नमिता दामले
मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे’ हे सुनील कर्णिक यांचे काही आठवणीतल्या शब्दधनाचा खजिना खुला करणारे पुस्तक आहे. यात काही गाणी आणि कविता आहेत, काही आत्मकथने, जंगलांच्या सफरी, काही विनोद आणि गहिरी वेदनाही आहे.
‘रात्री होत्या वेताळाच्या, परि उशाला स्वप्ने होती…’ कृ. शी. पेडणेकर यांच्या संग्रहातील या ओळींनी वेडी गाणी सुरू होतात तर शिरीष कणेकरांच्या ‘मी, माझं मला’नी पुस्तकाची सांगता आहे. पुस्तकवाचन, ग्रंथवेड हेही एक व्यसनच आहे. काही पुस्तके हाताला चिकटतात, काही विचारप्रवृत्त करतात तर काही आठवणींच्या खोल कप्प्यामधील खास गोष्टी वर काढतात अन् मग काही आपल्या स्मृतीकोशात कायमची विसावतात. 60 वर्षांपूर्वी साइखेडात घडून गेलेल्या इतिहासाची पुनरावृत्तीच वाटावी की काय अशी सरदेशमुखांची सत्यावर आधारित कादंबरी, कल्लप्पा ढालेंच्या डायरीची पाने, दडकरांची मुक्तनाटय़े, मलिक अंबर यांच्याबद्दलची नेमाडय़ांची खळबळजनक मते अशी या जादूच्या पोतडीतून अनमोल रत्ने वर येतात.
सिद्धार्थ पारधे यांच्या कॉलनीमधल्या सचिनच्या आठवणी, मारुती चित्तमपल्लींनी अनुवाद केलेली ‘एका कबुतराची कहाणी’, दत्ता वाकणकर यांचे ‘वणव्यातले ओलावे’, लालू दुर्वे यांचे फ्रँक बकच्या सफरी ही पुस्तके नोंद करून ठेवावीत अवश्य. खुद्द सत्यजित रे यांच्या शब्दात ‘पथेर पांचाली’, ‘अपराजित’ आणि ‘अपूर संसार’ या त्यांच्या जगभर गाजलेल्या चित्रत्रयीचा अनुभव आणि त्यातून साकारत गेलेले सत्यजित राय यांचे व्यक्तिमत्त्व हे आवर्जून वाचावेसे वाटते.
सुनील कर्णिक हे चोखंदळ वाचक आहेत आणि आपण अनुभवलेल्या सुंदर कलाकृतींचा अकृत्रिम आनंद ते या पुस्तकातून आपल्याला देऊ पाहतात. प्रत्येक पुस्तकावर केलेले भाष्य सडेतोड आहे. निव्वळ स्तुती कोठेच नाही. आवश्यक तिथे ताशेरे ओढत काय भावले आणि का भावले हे वर्णन करणारे कर्णिक कधीकधी तटस्थपणा सोडून भावुक होत लेखकाच्या भूमिकेशी तादात्म्य पावले आहेत. अनेक पुस्तके आणि लेखक यांच्याबद्दल उत्सुकता जागृत करणारा हा कर्णिक लेखन प्रपंच आहे.
मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे
लेखक – सुनील कर्णिक
प्रकाशक – डिंपल पब्लिकेशन
पृष्ठ – 143 मूल्य – 180 रुपये




























































