आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची भाजपा प्रवेशाची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धाराशिव -कळंब मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आज भाजपात प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा केली. ’परिवार संवाद’ कार्यक्रमात त्यांनी हे जाहीर केले. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांचे नातेवाईक असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पद्मसिंह पाटील तसेच त्यांचा मुलगा राणाजगजितसिंह पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेलाही या दोघांनी हजेरी लावली नव्हती, यामुळे हे पितापुत्र पक्ष सोडणार हे जवळपास निश्चित मानलं जात होते.

राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने शनिवारी म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी शहरातील लेडीज क्लबच्या मैदानावर एक सभा बोलावली होती. या सभेला ‘परिवार संवाद’ असं नाव देण्यात आलं होतं. या सभेत बोलताना  राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की ‘माझी अवस्था चक्रव्यूव्ह सापडलेल्या अभिमन्यूसारखी झाली आहे. हे चक्रव्यूह भेदण्यासाठी मी भाजपात प्रवेश करत आहे’  राणाजगजितसिंह पाटील यांचे वडील म्हणजेच पद्मसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या राजकीय वाटचालीत भक्कम साथ दिली होती. मात्र मुलासोबत त्यांनीही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकल्याने पक्षाला बसलेला हा आजपर्यंतचा सर्वात मोठा हादरा मानला जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा रविवारी सोलापूर येथे समारोप होणार आहे.  या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत. यावेळी आमदार राणाजगजितिंसह पाटील हे भाजपा प्रवेश करतील.