
ब्रह्मपुरी वनक्षेत्रातून मेळघाटात सोडण्यात आलेल्या वाघिणीने आता येथेही धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी रात्री वाघिणीने केलेल्या हल्ल्यात शोभराम चव्हाण नामक आदिवासी युवक ठार झाला आहे. तर त्याच्यासोबत असलेला दिलीप सुद्धा वाघिणीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ब्रह्मपुरीच्या जंगलात याच वाघिणीने धुमाकूळ घातल्यामुळे तिला मेळघाटातील अतिदुर्गम असलेल्या दादरा जंगल परिसरात सोडण्यात आले आहे. दरम्यान याच वाघिणीने गेल्या महिन्यापासूनच धुमाकूळ घालणे सुरू केले होते. यापूर्वी वाघिणीच्या हल्ल्यात गुरे ढोरे गाई-बकर्या मारल्या गेल्या. अशातच शुक्रवारी रात्री शोभाराम चव्हाण व दिलीप चव्हाण शुक्रवारी रात्री दहा वाजता दरम्यान घरी जात असताना याच वाघिणीने दोघांवरही हल्ल केला. यात शोभाराम गंभीर जखमी झाला. त्यानंतर लगेच त्याचा मृत्यू झाला. तर त्याचाच भाऊ दिलीप चव्हाण वाघिणीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला अमरावती येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
मेळघाटात सोडलेल्या या वाघिणीने धुमाकूळ घातल्यामुळे 20 गावातील आदिवासी बांधव हादरून गेले आहेत. या संदर्भात मेळघाटचे माजी आ.राजकुमार पटेल यांनी तशा तक्रारी वनविभागाकडे केल्या होत्या. परंतु वनविभाग सुद्धा हतबल असल्यामुळे वाघिणीचा बंदोबस्त करू शकला नाही.
बॉक्स
दरम्यान 26 ऑगस्ट रोजी याच वाघिणीने बिबामल गावात सुंदरलाल पेठकर यांच्या मालकीच्या दोन गायी, तीन वासरे फस्त केली आहेत. यासोबतच केकदाखेडा येथील सात वर्षीय बालिकेवर 3 जुलै रोजी प्राणघातक हल्ला केला होता. 6 जुलै रोजी कावडझिरी गावात 1 म्हैस फस्त केली. तर तिच्या मालकावर सुद्धा हल्ला केला होता. 19 जुलै रोजी तीन शेळ्या खाल्या व 12 जुलै रोजी कंजोली येथील महिलेवर हल्ला चढवून तिला गंभीर जखमी केले. 23 ऑगस्ट रोजी धोतरा गावात 4 शेळ्या मारल्यानंतर तिघा जणांना जखमी केले होते. 26 ऑगस्ट रोजी बिबामल गावात 3 गायी दोन वासरांचा याच वाघिणीने बळी घेतला.

























































