गणेशोत्सवाच्या तोंडावर हिंदूविरोधी जाहिरातीचा आरोप, नेटकऱ्यांची कंपनीविरोधात चळवळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

होळीच्या सणावेळी ‘हिंदूस्थान युनिलिव्हर’ या कंपनीच्या सर्फ एक्सल या कपडे धुण्याच्या पावडरीच्या एका जाहिरातीमुळे वादळ उठले होते. आता हिच कंपनी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पुन्हा वादात अडकली आहे. या कंपनीच्या ‘रेड लेबल’ या चहा पावडरसाठीच्या नव्या जाहिरातीवर हिंदूविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी याविरोधात आवाज उठवला असून सोशल मीडियावर #BoycottRedLabel हा हॅशटॅग सुरू आहे.

गणेश चतुर्थीपूर्वी प्रदर्शित झालेल्या या जाहिरातीमध्ये एक हिंदू व्यक्ती मुस्लीम मूर्तीकाराकडे गणपती बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी गेल्याचे दाखवण्यात आले आहे. दोघांमध्ये चर्चा होते आणि हिंदू तरुण एक मूर्ती घेण्याचे ठरवतो. याच दरम्यान मूर्ती विकणारा भोंग्यावरील अजानचा आवाज ऐकून डोक्यावर मुस्लीम टोपी घालतो. हे पाहून ग्राहकाच्या मनात चलबिचल होते आणि ‘आज थोडे काम आहे, मी उद्या येतो’ असे म्हणत तो जावू लागलो. ग्राहकाच्या या बोलण्यावर मूर्तीकार बोलतो की, ‘भावा, चहा तर घेऊन जा’, आणि नंतर चहा पिता पिता दोघांमधील समन्वय पुन्हा जुळून येतात.

यानंतर मूर्तीकार बोलतो की, ‘नमाज अदा करणारे हात गणपती बाप्पाची मूर्ती बनवणार तर मग चलबिचल तर होणारच ना?’ यावर मूर्ती घेण्यासाठी आलेला तरुण ‘हेच काम का?’ असा प्रश्न विचारतो. यानंतर मूर्तीकार म्हणतो की, ‘हिच तर पूजा आहे.’ मूर्तीकाराच्या या बोलण्याने प्रभावित होऊन ग्राहक बाप्पाची मूर्ती घेऊन जातो, असे यात दाखवण्यात आले आहे.

नेटिझन्सचा सवाल
हिंदूस्थान युनिलिव्हरच्या रेड लेबल या चहा पावडरीच्या जाहिरातीसाठी रचण्यात आलेल्या या कथेवर नेटिझन्सने सवाल उपस्थित केला आहे. प्रत्येक वेळी हिंदूंनाच का कमी दाखवण्यात येते, असा सवाल उपस्थित करत नेटिझन्सने #BoycottRedLabel हा हॅशटॅग वापरला आहे. ट्रोलर्सने कंपनीवर हिंदूविरोधी असल्याचा ठपका ठेवला आहे.