अतुलबाबांना आमदार करा; आम्ही त्यांना मंत्री करतो – चंद्रकांत पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महायुतीच्या जागावाटपात कराड दक्षिण मतदारसंघ हा भाजपकडेच असेल आणि अतुलबाबा भोसले हेच पक्षाचे अधिकृत उमेदवार असतील, अशी जाहीर घोषणा करत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अतुलबाबांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. इतकेच नव्हे, तर कराड दक्षिणच्या जनतेने अतुलबाबांना आमदार करावे, आम्ही त्यांना मंत्री करू, अशी ग्वाही दिली. आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी कराड दक्षिणमधील भाजपा कार्यकर्त्यांचे आटके टप्पा येथे विजय संकल्प बूथ संमेलन आयोजित करण्यात आले होते.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान निवडणूक होणार असून, गेल्या 70 वर्षात जे कुठल्याही सरकारला जमले नाही ते भाजपा सरकारने केले. कलम 370, ट्रिपल तलाक पद्धत रद्द करण्याचा धाडसी निर्णय मोदी सरकारने घेतला. राज्यातही आत्तापर्यंत गेल्या 60 वर्षात अनेक मराठा मुख्यमंत्री झाले. पण मराठा समाजाला आरक्षण देण्याचे महत्वपूर्ण कार्य हे ब्राम्हण असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. देशाचा स्वातंत्र्यानंतरचा अजेंडा अजून अपूर्ण आहे. हा वैचारिक अजेंडा पूर्णत्वास नेण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना निवडून देणे गरजेचे आहे.