मोबाईलवर नको, मैदानात खेळा! आदित्य ठाकरे यांचा ठाणेकरांना फिटनेस मंत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात ‘फिटनेस इंडिया’ मुव्हमेंट सुरू असताना आपण मात्र मोबाईलवर क्रिकेट, फुटबॉल, टेबल टेनिस, स्क्वॉश यांसारखे खेळ खेळत आहोत. त्यामुळे आजार वाढत चालले असून लाइफस्टाईल बदलतेय. हॉस्पिटल टाळून निरोगी आयुष्य जगायचे असेल तर मोबाईलवर नको, प्रत्यक्ष मैदानात उतरून खेळ खेळा.. अशा शब्दांत शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज समस्त ठाणेकरांना फिटनेस मंत्र दिला.

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळील परबवाडी येथे उभारलेल्या सुसज्ज आनंद दिघे क्रीडा संकुलाचा शानदार लोकार्पण सोहळा आज पार पडला. त्यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, मोबाईलवर पब्जी, रेसिंग अगदी क्रिकेटही आपण खेळतो. पण ते टाळून मैदानावर उतरण्याची गरज आहे. तरच शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहील. यावेळी ज्येष्ठ नागरिक उद्यान व प्रादेशिक मनोरुग्णालयासमोरील चौकाचेदेखील लोकार्पण करण्यात आले. हे प्रकल्प  सभागृह नेते नरेश म्हस्के व शिक्षण सभापती विकास रेपाळे यांच्या संकल्पनेतून साकारले आहेत.

एकनाथ शिंदे राज्यात कुठूनही निवडून येतील

शिवसेना नेते, ठाण्याचे पालकमंत्री तसेच आरोग्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या कामाचा झपाटा एवढा मोठा आहे की, ते राज्यात सर्वत्र फिरत आहेत. एकनाथ शिंदे कुठूनही निवडणुकीला उभे राहिले तरी लोकप्रिय नेते म्हणून निश्चित निवडून येतील, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, सुभाष भोईर, प्रताप सरनाईक, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, शिक्षण सभापती विकास रेपाळे, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के, वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्या नम्रता भोसले, स्थानिक नगरसेविका नम्रता फाटक, मीनल संखे आदी उपस्थित होते.

 क्रीडा संकुलात या सुविधा

ठाणे महानगरपालिकेने तीन मजल्याचे सुसज्ज आनंद दिघे क्रीडा संकुल उभारले असून त्यासाठी साडेचार कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या संकुलात टेबल टेनिस, कॅरम, चेस रूम, व्यायामशाळा, स्क्वॉश कोर्ट, प्रेक्षक गॅलरी अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.