नगरच्या जि.प.कर्मचारी सोसायटीतील गणपतीला चलनी नाण्यांची सजावट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून सोसायटीत श्रींची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दरवर्षी सोसायटीतील कर्मचारी संतोष हरबा गणेशमूर्तीची आगळीवेगळी सजावट करून वेगळ्या रुपात मूर्ती सादर करतात. यंदा त्यांनी चलनी नाणी वापरुन सुमारे साडेपाच फूटाची गणेशमूर्ती साकारली आहे. एक महिना मेहनत करीत त्यांनी तब्बल 3 हजार 500 नाण्यांचा वापर करीत मूर्ती सजवली आहे. गणपतीची अनोखी सेवा करण्यातून मोठे समाधान मिळत असल्याचे हरबा यांनी सांगितले.

विघ्नहर्त्या गणरायांची विविध रुपे प्रत्येकाला मोहित करीत असतात. नगरच्या जि.प.कर्मचारी सोसायटीतील संतोष हरबा आपले दैनंदिन कामकाज सांभाळून महिनाभर आधीच गणपतीची तयारी करतात. मोठी मूर्ती निवडून ते मूर्तीला वेगळ्या पध्दतीने कल्पकतेने सजवतात. गेल्या 18 वर्षांपासून ते वेगवेगळ्या सजावटीचे गणपती साकारत आहेत. याआधी त्यांनी स्ट्रॉ, डिस्को मनी, थर्माकोल गोळी, कडधान्य, कुंदनचे खडे, खोबरा किस, गरम मसाला, चहा पावडर, काडेपेटीतील काड्या, चमकी, सुपारी, काचा, मोती, शर्टच्या गुंड्या अशा विविध वस्तूंपासून मूर्ती साकारल्या होत्या. दरवर्षी वेगळेपणा जपण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.त्यामुळे यंदा त्यांनी चलनी नाण्यांचा वापर करून अतिशय सुंदर व मनमोहक गणेशमूर्ती साकारली आहे. या उपक्रमासाठी त्यांना संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक तसेच सहकार्‍यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते.