शमी स्वत:ला शक्तीशाली, मोठा क्रिकेटर समजतो, पण..! वॉरंटनंतर हसिनची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोलकाताच्या अलीपूर न्यायालयाने हिंदुस्थानचा क्रिकेटपटू मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरंट जारी केल्यानंतर त्याची पत्नी हसिन जहाँ हिने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शमी स्वत:ला खूप शक्तीशाली समजतो, परंतु रामरहिम आणि आसाराम सारखे लोक न्यायव्यवस्थेच्या कचाट्यातून वाचू शकलेले नाहीत. त्यामुळे शमीलाही शिक्षा मिळेल अशी आशा मला असल्याचे त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप करणाऱ्या हसिनने म्हटले आहे.

न्यायालयाने शमीविरोधात अटक वॉरंट जारी केले असून आत्मसमर्पणासाठी 15 दिवसांचा अवधी दिला आहे. यादरम्यान तो अटकपूर्व जामिनासाठी अर्जही करू शकतो. न्यायालयाच्या या निर्देशानंतर शमीची पत्नी हसिन म्हणाली की, ‘माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून न्याय मिळवण्यासाठी झगडत आहे. तुम्ही सर्वच जाणता की, शमी स्वत:ला खूप शक्तीशाली आणि मोठा क्रिकेटर समजतो, परंतु न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे.’ एएनआय या वृत्तवाहिनीशी बोलताना हसिनने ही प्रतिक्रिया दिली.

शमी आणि भावाविरुद्ध अटक वॉरंट
2018 मध्ये दाखल करण्यात आलेल्या घरगुती हिंसाचाराप्रकरणी दाखल खटल्यात अलीपूर न्यायालयाचे न्यायमूर्ती सुबर्ता मुखर्जी यांनी शमी आणि त्याच्या भावाविरोधात अटक वॉरंट जारी केले. हे वॉरंट जारी केले तेव्हा शमी विंडीज दौऱ्यावर कसोटी खेळत होता. सोमवारी टीम इंडियाचा विंडीज दौरा संपल्याने तो माघारी परतेल आणि जामिनासाठी प्रयत्न करेन अशी शक्यता आहे.