गौरी आगमनासाठी आज दिवसभर मुहूर्त,पंचांगकर्ते दा. कृ. सोमण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठा गौरींचे घरोघरी आगमन होत आहे. गुरुवारी दिवसभर अनुराधा नक्षत्र असल्यामुळे दिवसभरात कधीही गौरी आणता येतील अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना गौरींचे आगमन होते. चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरींचे पूजन होते, तर चंद्र मूळ नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरींचे विसर्जन केले जाते, असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. ज्येष्ठा गौरी, चैत्र गौरी, मंगळागौरी, हरितालिका आणि नवरात्रात पार्वतीची पूजा केली जाते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गौरी आगमन म्हणजे सासरी गेलेल्या मुलीला माहेरी येण्याचा हक्काचा दिवस. गौरी आगमनाच्या दिवशी माहेरी आलेल्या मुलीची ओटी भरून पूजा केली जाते. काही ठिकाणी पूर्णाकृती तर काही ठिकाणी खडय़ाच्या गौरी बसवण्याची पद्धत आहे. ज्येष्ठा गौरींचे आगमन, पूजन आणि विसर्जन मुहूर्तावरच केले जाते.

उद्या दिवसभर अनुराधा नक्षत्र असल्यामुळे दिवसभरात कधीही गौरी आणता येतील. गौरींचे पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर केले जाते. शुक्रवार म्हणजे 6 सप्टेंबर रोजी दिवसभर ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे ज्येष्ठा गौरींचे पूजन दिवसभर करता येईल तर शनिवारी म्हणजे 7 सप्टेंबरला दिवसभर मूळ नक्षत्र असल्यामुळे दिवसभरात कधीही ज्येष्ठा गौरींचे विसर्जन करता येईल, असे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.