जोरदार पावसाने रेल्वेचे तिन्ही मार्ग ठप्प,शिवसैनिक धावले मुंबईकरांच्या मदतीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai rains Western Railway helpdesk

ऐन गणेशोत्सवात सक्रिय झालेल्या पावसाने बुधवारी मुंबईच्या लाइफलाइन असलेल्या उपनगरीय रेल्वेची पुरती दैना करून टाकली. रात्रभर कोसळत असलेल्या पावसाने रेल्वेचे तिन्ही मार्ग ठप्प केले. मेट्रो, बेस्टने आणि मोनोरेलने जागोजागी अडकून पडलेल्या प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा दिला. शीव-कुर्ला, चुनाभट्टी आणि माहीम-माटुंगा रोड परिसरात रेल्वे रुळावर पाणी साचल्याने दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी तसेच हार्बरची वडाळा ते वाशी वाहतूक बंद पडली. त्यानंतर माहीम आणि माटुंगा रोड तसेच नालासोपारा येथे रुळावर पाणी भरल्याने पश्चिम रेल्वेची विरारच्या पुढील वाहतूक ठप्प झाली.

सीएसएमटीत प्रवाशांची घोषणाबाजी

जोरदार पावसाने दुपारी 12 वाजल्यापासून बंद असलेल्या मध्य आणि हार्बर सेवेमुळे नाराज झालेल्या प्रवाशांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पावसाने मुंबईची लाइफलाइन बंद पडली असताना मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलेल्या रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यावर अवाक्षरही काढले नसल्यानेही आश्चर्य व्यक्त होत आहे.

बेस्ट आणि मेट्रो आली कामाला

शहरातील अनेक रस्त्यांवरील वाहतूक पाणी तुंबल्याने मंदावली. पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्गावरदेखील गाडय़ांच्या रांगा लागल्या. लोकलच्या गोंधळामुळे अनेकांनी बेस्ट, मेट्रो तसेच मोनोरेलचा आधार घेतला. मेट्रो आणि बेस्टने प्रवाशांना दिलासा दिला तर मोनोरेलच्या फेऱ्या प्रवाशांनी तुडुंब भरल्याने तिकीट विक्री थांबविण्याची नौबत मोनोरेल प्रशासनावर आली.

लांब पल्ल्याच्या वाहतुकीला फटका

पावसाचा फटका लांब पल्ल्याच्या वाहतुकीलादेखील बसला. सीएसएमटी-चेन्नई, सीएसएमटी-भुवनेश्वर, एलटीटी-गोरखपूर, सीएसएमटी-पुणे, सीएसएमटी-पुणे, सीएसएमटी-पुणे, सीएसएमटी-कोल्हापूर, सीएसएमटी-मनमाड, सीएसएमटी-नांदेड, सीएसएमटी-रत्नागिरी आणि पनवेल-सावंतवाडी या गाडय़ा रद्द करण्यात आल्या.

मिठीने अडवली मुंबईकरांची वाट

अतिवृष्टीने कुर्ला ते शीव-चुनाभट्टी-माटुंगा रोड स्थानक परिसरात जमलेल्या पावसाच्या पाण्यास मिठी नदीचा पूर जबाबदार असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे. मिठी नदीची पूररेषा गृहीत धरूनच मध्य रेल्वेचा मार्ग बांधण्यात आला आहे. मात्र, मिठी नदीचे पात्रात काही तरी बदल झाल्याने पूररेषा अचानक वाढल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मिठी नदीचे पाणी जोपर्यंत ओसरत नाही तोपर्यंत ट्रेन चालविणे कठीण असल्याचे म्हटले जात आहे. भरती सुरू असताना मिठी नदीचे समुद्राला मिळणारे पाणी गेटने अडविले जाते. भरती संपल्यानंतर हे गेट पुन्हा उघडले जाते. परंतु गेट उघडूनही पाण्याची पातळी न घटल्याने मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेला बुधवारी रात्री उशीरापर्यंत जोरदार फटका बसल्याचे म्हटले जात आहे.

सिद्धिविनायक मंदिरात निवाऱ्याची सोय

मुंबईतील पावसामुळे प्रभादेवी परिसरात जर कोणी अडकले असेल तर त्यांनी प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिराच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क करावा, त्यांच्या प्रसादाची आणि पाऊस ओसरेपर्यंत निवार्याची सोय करण्यात येईल असे आवाहन सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी केले आहे. मुंबईत पावसामुळे जागोजागी बाहेरगावाहून आलेले प्रवासी अडकले असून त्यांच्या निवार्यासाठी महापालिकांच्या शाळांप्रमाणे सिद्धिविनायक मंदिरातही सोय करण्यात आली आहे.

प्रवाशांची आरपीएफने केली सुटका

जोरदार पावसाने कुर्ला ते शीव-चुनाभट्टी-माटुंगा परिसरात पाणी तुंबल्याने लोकल ट्रेन जागोजागी अडकल्या. त्यामुळे लोकलमध्ये अडकलेल्या ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांची मध्य रेल्वेच्या जवानांनी सुटका केली. परळ ते दादर सेक्शनमध्ये खोळंबलेल्या टिटवाळा आणि अंबरनाथ लोकलमधील अडकलेल्या शेकडो प्रवाशांची रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी सुटका केल्याचे मध्य रेल्वे आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त अश्रफ के. के. यांनी सांगितले.

पुणे – मुंबई धावणाऱ्या गाडय़ा आज रद्द

मुंबई परिसरातील संततधार पाकसाचा फटका बुधवारी रेल्के काहतुकीला बसला. रेल्के रूळांकर साचलेले पाणी आणि पाकसामुळे पुणे – मुंबई दरम्यान धावणाऱ्या अनेक गाडय़ा रद्द होत्या. तर, गुरुवारी (दि.5) देखील पुणे – मुंबई मार्गावरील गाडय़ांसह इतर काही गाडय़ा रद्द ठेवण्यात आल्या आहेत.

शिवसैनिक धावले मुंबईकरांच्या मदतीला

मुसळधार  पावसामुळे मुंबईकरांची पार दाणादाण उडाली. कार्यालयात जाण्यासाठी निघालेल्या किंवा नाइट शिफ्ट करून घराकडे निघालेले लाखो मुंबईकर रस्तोरस्ती, लोकल गाडय़ांमध्ये अडकून पडले. घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. त्यांच्या मदतीसाठी शिवसैनिकांनी धाव घेतली. गोणी नगर परिसरात आनंदी निवास येथील रहिवाशांच्या घरात पाणी शिरले. त्यांच्या अल्पोपाहाराची व्यवस्था नगरसेवक अनंत (बाळा) नर केली. समीर परब, संजय खानविलकर, दिनेश भोसले, अक्षय, सचिन वाडेकर यांनी मदतकार्यात सहभाग घेतला. जोगेश्वरी पूर्वेकडील मेघवाडी, शामनगर, इंदिरा नगर, गोणी नगर, आझाद नगर, आदर्श नगर, हनुमान चौक परिसरात मजास नाल्याशेजारी असंख्य रहिवाशांच्या घरात पाणी शिरले आणि मोठे नुकसान झाले. या भागात शाखाप्रमुख नंदू ताम्हणकर, उदय हेगिष्टे, सुनील म्हसकर, नीलेश कदम, बाळा कांबळी आदी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घरोघरी फिरून नागरिकांची मदत केली.

विभाग क्रमांक 12 च्या वतीने प्रवाशांना मदत

दक्षिण मुंबईतील विभाग क्रमांक 12 च्या वतीने सीएसएमटी रेल्वे स्थानकावर अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी मनोहरदास म्युनिसिपल शाळा आणि बाई कबीबाई शाळा या ठिकाणी राहण्या-खाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक गणेश सानप, नगरसेविका सुजाता सानप, महिला उपविभागप्रमुख दिना दौंडकर व असंख्य शिवसैनिकांनी सहकार्य केले.

रत्नागिरीत पूर, राजापूरच्या जवाहर चौकात पुराचे पाणी

रत्नागिरी जिह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून राजापूरच्या जवाहर चौकात पुराचे पाणी शिरले आहे. अर्जुना आणि कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी जवाहर चौकात शिरल्याने सर्व परिसर जलमय झाला आहे. रत्नागिरी जिह्यात गेल्या 24 तासांत 100.56 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील पाच दिवस कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असून किनारपट्टीवरून ताशी 55 कि.मी.वेगाने वादळी वारे वाहणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

ताडदेवमध्ये शिवसैनिकांनी झाड हटवले

दुपारी पंडित मदन मोहन मालवीय रोड येथिल फ़िल्म सेंटर जवळ असलेले वडाचे झाड पडले. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.  स्थानिक नगरसेविका अरुंधती दुधवडकर यांनी तत्काळ पालिकेचे कर्मचारी व ताडदेव पोलीस ठाण्याच्या सहकार्याने झाड हटवले. त्यामुळे वाहतुक सुरुळीत झाली. युवासेना विभाग अधिकारी हेमंत दुधवडकर व सहसमन्वयक किरण बाळसराफ हे हजर होते.

मुंबईच्या डबेवाल्यांनाही फटका

मुंबईतील मुसळधार पावसाचा  फटका मुंबईच्या डबेवाल्यांच्या सेवेलाही बसला. मुसळधार पावसामुळे डबेवाल्यांचे संपूर्ण वेळापत्रकच कोलमडून गेले. पावसाचा जोर वाढला आणि रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे डबेवालेही बंद लोकलमध्ये जागोजागी अडकून पडले. अनेक डबेवाले दुपारी 2 वाजता रिकामे डबे घेऊन माघारी फिरले, परंतु तेही लोकलमध्ये अडकून पडले. सोबत डबे असल्यामुळे त्यांना लोकलमधून सोडून पायी चालतही जाता आले नाही. अशा प्रकारे मुंबईच्या डबेवाल्यांची मुसळधार पावसाने तारांबळ उडवून दिली.