
शववाहिका, पथदिवे आणि छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण अशा महत्त्वाच्या विषयांच्या सभेला सत्ताधारी शाहू आघाडी केवळ राजकारणासाठी विरोध करीत असेल, तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. शहराच्या विकासाला शाहू आघाडीने विरोध करून लोकशाहीचा बलात्कारच केला आहे, अशी घणाघाती टीका नगराध्यक्षा डॉ. नीता माने यांनी पत्रकार बैठकीत केली. तात्काळ विशेष सभेला राजर्षि शाहू आघाडीचे सर्व सदस्य गैरहजर राहिल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विकासाच्या आड राजकारण आणणार्या या आघाडीबाबत आपण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. माने म्हणाल्या, की शहराला गेली कित्येक वर्षे शववाहिका नाही. ती घेण्यासाठी आम्ही आमदार उल्हास पाटील यांच्या स्थानिक निधी मिळविला आहे. जिल्हा शल्यचिकीत्सक व वरिष्ठ अधिकार्यांनी पालिकेकडे केवळ ना-हरकत प्रमाणपत्र मागितले आहे. मात्र, त्यासाठी सभेत ठराव होणे गरजेचे होते. पुतळे सुशोभीकरणाचा ठराव २०१५ मध्येच झाला आहे. पण, त्यावर सूचक, अनुमोदक व तत्कालीन नगराध्यक्षांच्या स्वाक्षर्याच नसल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय त्यावेळेपेक्षा कैक पटीने जास्त निधी आमदारांनी उपलब्ध करून दिला आहे. हायमास्ट पथदिवे बसविण्याचा ठरावही झाला आहे. तरीही सत्ताधारी आघाडी केवळ राजकीय आकसापोटी सभेला गैरहजर राहून विकासात अडथळे आणत आहे. शाहू महाराजांच्या नावावर राजकीय आघाडी स्थापन करणारी मंडळी केवळ बहुमताच्या जोरावर ठराव होऊ न देता लोकशाहीचा बलात्कार करीत आहेत. याच विषयांवर जुलै महिन्यात बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेलाही शाहू आघाडीचे सदस्य आले नाहीत. जयसिंगपूरचे नागरिक सुजाण आहेत. त्यांना सर्व काही समजते. शाहू आघाडीच्या सदस्यांना जनताच त्यांची जागा दाखवून देईल. मात्र, नाईलाजाने सभा रद्द करावी लागल्याबद्दल याला जबाबदार असणार्या शाहू आघाडीचा आम्ही निषेध करीत आहोत. विकासकामांना विरोध करणार असाल, तर ताराराणी आघाडीच्या सर्व नगरसेवकांसह आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन, उपोषणाच्या माध्यमातून विकासकामे करून घेऊ, असेही त्यांनी सांगितले.




























































