ज्ञानदानाचे अविरत कार्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत काशिद

चिल्ड्रेन वेल्फेअर सेंटर या शैक्षणिक संस्थेचे  ज्ञानदानाचे अविरत कार्य गेली 9 वर्षे अविरत सुरु आहे. आदर्श शिक्षणाचे दाखले देत या संस्थेने आपली ओळख कायम ठेवली आहे.

1980 चं दशक. मुंबईच्या उत्तर-पश्चिम किनाऱयावर वसलेलं वर्सोवा गाव तेव्हा आजच्यासारखं नावारूपाला आलेलं नव्हतं. उच्चभ्रू लोक इथे राहायला यायला अद्याप सुरुवातही झालेली नव्हती. कोळ्यांचं गाव होतं ते. अशा वातावरणात कश्मिरी वडील आणि मराठी आईच्या पोटी जन्मलेल्या विशीतल्या एका तरुणाच्या डोक्यात वेगळाच विचार सुरू होता. वर्सोव्यातल्या सर्वसामान्यांच्या मुला-मुलींना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं देता येईल, त्यासाठी शाळा कशी सुरू करता येईल या विचारात हा तरुण गढून गेला होता. स्वतःची शाळा सुरू करणं हेच त्याचं एकमेव स्वप्न होतं. 1981 चं शैक्षणिक वर्ष सुरू होत असतानाच या तरुणाने जेमतेम 30 मुलांच्या वर्गाला शिकवायला सुरुवात केली आणि जन्म झाला चिल्ड्रेन वेल्फेअर सेंटर प्रायमरी स्कूलचा.

वर्सोव्यातल्या एका लहानशा जागेतल्या वर्गात ही शाळा सुरू झाली होती. अजय कौल यांनी घरोघरी जाऊन पालकांच्या गाठीभेटी घेऊन तुमच्या मुलांना शाळेत पाठवा असं आवाहन करायला सुरुवात केली आणि म्हणता म्हणता 1985 पर्यंत चिल्ड्रेन वेल्फेअर सेंटर स्कूल ही एक शैक्षणिक संस्था म्हणून नावारूपाला आली. 1991 मध्ये वर्सोव्यातल्या यारी रोड येथे या शैक्षणिक संस्थेला भूखंड मिळाला. आज या शैक्षणिक संस्थेत प्राथमिक ते पदव्युत्तर पातळीपर्यंतच्या वर्गांमध्ये एकूण मिळून तब्बल 4500 विद्यार्थी शिकत आहेत.

अजय कौल यांनी आपल्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान दिलं नाही. आपली शाळा प्रत्येक अर्थाने एक आदर्श शाळा बनावी, कला-क्रीडा-विज्ञान सर्वच क्षेत्रांत विद्यार्थ्यांनी नावारूपाला यावं यासाठी शाळेत प्रत्येक अद्ययावत सुविधा कौल सरांनी उपलब्ध करून दिली. त्यासाठी सुरुवातीच्या काळात कौल स्वतः भटकले. विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळावं यासाठी सर्वोत्कृष्ट शिक्षक नेमण्यासाठी त्यांनी विशेष लक्ष दिलं. त्याचाच परिणाम म्हणून अभ्यास असो वा सांस्कृतिक उपक्रम चिल्ड्रेन वेल्फेअस सेंटरचे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सामाजिक जबाबदारीचं भान विकसित करण्याकडे कौल सरांनी सर्वोच्च प्राधान्य दिलं. राष्ट्रभक्ती, धार्मिक-जातीय सद्भावना, श्रमप्रतिष्ठा आदी मूल्यं विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम मनावर योग्य वयातच बिंबवण्यासाठी त्यांनी जनजागृतीच्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं.

त्यांनी म्हणता म्हणता एका लहानशा शैक्षणिक संस्थेचं रूपांतर एका वटवृक्षासमान शैक्षणिक संकुलात केलं. ‘सर्वसामान्य जनतेची सेवा करा, तरुणांना सहकार्य करा आणि ज्ञानदानातून विद्यार्थ्यांना घडवा’ ही त्रिसूत्री त्यांनी कायम पाळली. अविरत काम करून त्यांनी स्वतःच्या आईच्या नावाने क्लॅराज् वाणिज्य महाविद्यालय स्थापन केले. आईकडूनच त्यांना समाजकार्याचे बाळकडू मिळाले आहे. भविष्यासाठी गुणवत्तेचे शिक्षक तयार व्हावेत यासाठी त्यांनी 2009 मध्ये क्लॅराज् शिक्षण महाविद्यालयसुद्धा सुरू केले. त्यापाठोपाठ चिल्ड्रेन वेल्फेअर सेंटर कायदा महाविद्यालय स्थापन केले.

महाराष्ट्र शासनाने त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन 2002 मध्ये त्यांना ‘उत्कृष्ट शिक्षक’ हा पुरस्कार प्रदान केला. त्यानंतर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. आज वयाच्या साठीतही अजय कौल पूर्वीच्याच उत्साहाने कार्यरत आहेत. समाजातील धार्मिक तणाव कमी व्हावा, धर्माधर्मातील द्वेष कमी व्हावा यासाठी ‘एकता मंच’ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ते अंधेरी-वर्सोवा परिसरात कार्य करीत आहेत. ‘मोहल्ला कमिटी’च्या माध्यमातून सर्व धर्मांतील तरुण-तरुणींना समाज हितासाठी एकत्र आणण्याचं काम ते करताहेत.