अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेऊ, क्षीरसागरांच्या पाठीशी ताकद उभी करू! आनंद जाधव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘कोणत्याही परिस्थितीत बीड विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकावयाचा आहे. ज्यांनी शिवबंधन बांधले ते आमचे झाले. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. गुंडाचा मुकाबला करण्यासाठी शिवसेना सक्षम आहे. जे अंगावर येतील त्यांना शिंगावर घेऊ. जयदत्त क्षीरसागरांच्या पाठीशी शिवसैनिकांची ताकद उभी करू’, असा विश्वास बीडचे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी व्यक्त केला. बीडमध्ये शनिवारी शिवसेनेच्या बुथप्रमुख, गटप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री बदामराव पंडित, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे सह पदाधिकारी उपस्थित होते.

आनंद जाधव पुढे म्हणाले, जे आमच्या पक्षात आले, शिवबंधन बांधले ते आता आमचे झाले. त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. हिच शिकवण आपल्याला शिवसेनाप्रमुखांनी दिली आहे. आता रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेचे आहे. त्यांच्या पाठीशी शिवसेनेची ताकद उभी करू, जे अंगावर येतील त्यांना शिंगावर घेऊ, गुंडाचा मुकाबला करण्यासाठी शिवसेना सक्षम आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्यासारखा विचाराचा नेता शिवसेनेला मिळाला आहे. ते मोठ्या मनाचे माणूस आहेत. कोणतेही पद माझ्या कार्यकर्त्याला देऊ नका, शिवसेनेच्या निष्ठावंतांना पदे द्या असे सांगून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसैनिकांनी आपली ताकद दाखवून त्यांना विजयी करायचे आहे.