महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा लाक्षणिक कामबंद संप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन अंतर्गत सर्व युनियन कर्मचाऱ्यांचा आज विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्यस्तरीय एक दिवसीय कामबंद संप करण्यात आला. रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व कामगारांनी कामबंद आंदोलनात सहभाग घेऊन 100 टक्के आंदोलन यशस्वी केले आहे. रायगड जिल्हा परिषदमध्ये काम बंद संप असल्यामुळे कार्यालयात शुकशुकाट पसरला होता. संघटनेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले.

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांरी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे वारंवार अर्ज व आंदोलन करीत आहेत. मात्र शासनाकडून कोणतीही पावले उचलली जात नाहीत. पुणे येथे झालेल्या बैठकीत शासनाविरोधात नाराजी पसरली होती. पुणे येथील बैठकीत आज 9 सप्टेंबर रोजी कामबंद संप करण्याबाबत ठरले होते. त्यानुसार आज जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे काम बंद संप केले आहे. रायगड जिल्हा परिषद समोर कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली.

जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्व संवर्गातील वेतनत्रुटी दूर कराव्या, खाजगी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, केंद्राप्रमाणे भत्ते मिळावे, लिपिक व लेखा लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करावी, केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना सवलती लागू कराव्यात, पदोन्नती व सरळ सेवा वेतनातील तफावत दूर करावी, चतुर्थ कर्मचाऱ्यांची वसुली थांबवून 40-10-50 टक्केवारी करावी, अनुकंपा भर्ती करावी, अर्जित रजा साठविण्याची मर्यादा वाढावी, शिक्षकांना अशिक्षित कामे देऊ नये, शिक्षण व आरोग्य यांच्यावर 6 टक्के जीडीपी खर्च करावा व खाजगीकरण बंद करावे, कामाचे तास निश्चित होईपर्यत बायोमेट्रिक प्रणाली आणू नये, संघटनेने केलेल्या मागण्यांवर तातडीने कारवाई व्हावी, निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी आदेश काढून मुख्यमंत्री पातळीवर बैठक लावावी या मागण्या संघटनेच्या आहेत.