एकादशीला यान सोडल्यानेच अमेरिकेची मोहीम यशस्वी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रह्मांडातील नक्षत्रांची स्थिती एकादशीला संतुलित असते. त्यामुळेच अमेरिकेने एकादशीच्या दिवशी त्यांचे यान अंतराळात सोडल्याने त्यांची मोहीम यशस्वी झाली. भारतीय कालमापन पद्धतीमुळेच हे शक्य झाल्याचा दावा शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केला आहे.

सोलापुरात 29 पासून सुरू होणाऱ्या नवरात्र महोत्सवानिमित्त शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना संभाजी भिडे गुरुजी बोलत होते. अमेरिकेने एकादशीच्या दिवशी अंतराळात यान सोडले म्हणून अमेरिकेची चांद्रयान मोहीम यशस्वी झाली असे मत भिडे गुरुजी यांनी मांडले. भारतीय कालमापन पद्धतीत एका सेकंदाचा हजारावा भाग मोजण्याची क्षमता आहे. त्यामुळेच चांद्रमोहीम राबविताना अमेरिकेने भारतीय कालमापन पद्धतीचा आधार घेतला. चंद्राकर उपग्रह सोडण्याचे अमेरिकेचे 38 प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यानंतर नासाच्या वैज्ञानिकांनी भारतीय कालमापन पद्धतीचा अभ्यास केला आणि एकादशीच्या दिवशी उपग्रह अंतराळात सोडून चांद्रयान मोहीम फत्ते केली, असा तर्कही त्यांनी मांडला. हिंदुस्थानच्या चांद्रमोहिमेला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर भिडे गुरुजी यांनी वरील दावा केला आहे.