जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले असून राष्ट्रवादीचे जिल्हा पदाधिकारी, लोकप्रतिनिधीसह अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना उपनेते व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी राष्ट्रवादीला जबरदस्त दणका देऊन जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे वर्चस्व निर्माण केले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे व शिवसेनेच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवत तसेच सहकार राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांच्यावर विश्वास ठेवत राष्ट्रवादीचे माजी विधानसभा क्षेत्रप्रमुख गोपाल पाटील ,शेतकी संघाचे माजी चेअरमन पांडुरंग पाटील , राष्ट्रवादीचे मार्केटचे संचालक मच्छिंद्र पाटील , राष्ट्रवादीचे तालुका संघटक अर्जुन पाटील या दिग्गजांसह राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी “मातोश्रीवर” शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे शिवसेना व युवासेनेचे पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी शिवसेना जिंदाबाद ! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद या घोषणानी सभागृह दणाणून सोडले.

शिवसेना प्रवेशासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांनी जळगाव येथून विमानाने प्रवास करीत मुंबई गाठली तर काही पदाधिकारी रेल्वेने आगोदरच मुंबईत पोहचले होते. प्रवेश समारंभाप्रसंगी शिवसेना शिवसेना नेते तथा आरोग्य व बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हा प्रमुख जळगांव गुलाबराव वाघ,महिला आघाडीच्या लोकसभा संपर्क प्रमुख अर्चना पाटील, उपजिल्हा संघटक नाना सोनवणे, कृ. ऊ.बा.चे सभापती कैलास चौधरी, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण,जि.प .चे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, रमेश पाटील, पंकज पाटील,प्रमोद सोनवणे, सचिन पाटील, चंद्रशेखर पाटील, रामचन्द्र पाटील, प्रमोद सोनवणे, बाला शेठ यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.