
मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेले आरे जंगलच म्हणजे मुंबईरूपी हिर्यातील हिरव्या पाचूचे कोंदणच आहे. जैवविविधतेने नटलेले जंगल म्हणजे मुंबईचा श्वासच आहे. या जंगलात बिबट्यांचे वास्तव्य आहेच, पण जगातील अत्यंत दुर्मिळ अशी रस्टी स्पॉटेड कॅट या मांजरीची प्रजाती तसेच दुर्मिळ कोळी प्रजाती, असंख्य प्रकारची फुलपाखरे, मधमाशा आणि 120 प्रकारच्या पक्ष्यांचे वास्तव्य या जंगलात आहे. त्यामुळे मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी आरेचे जंगल नष्ट केले तर मुंबईचा श्वासच बंद होईल. सृष्टीची जैवविविधता जपण्यासाठी आरेचे जंगल वाचवण्याची गरज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह पर्यावरणतज्ञ व अभ्यासकांनी व्यक्त केली.
मेट्रो-3 प्रकल्पासाठी आरे परिसरात कारशेड उभारली नाही तर हा प्रकल्प पूर्णच होऊ शकत नाही असा दावा मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी केला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 2 हजार 700 झाडे तोडावी लागणार असल्यामुळे आरेचे जंगल वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही आरेचे जंगल वाचवण्यासाठी ‘कारे आरे’ ही मोहीम राबवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पर्यावरणप्रेमी व वन्यजीव अभ्यासक आणि वन्यजीव छायाचित्रकार नयन खानोलकर, आरेच्या जंगलातील अभ्यासक राजेश सानप आणि पर्यावरणप्रेमी झोरू भातेना यांनी शिवसेना भवनमध्ये मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आरेच्या जंगलातील जैवविविधतेचे सादरीकरण केले.






















































