एमडीएचच्या सांबार मसाल्यात सापडले विषाणू, नमुना तपासणीचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील नामांकित मसाला कंपनी असलेल्या एमडीएचच्या सांबार मसाल्यात विषाणू आढळले आहेत. यामुळे कंपनीच्या सर्वच उत्पादनांच्या नमुन्याची चाचणी केली जाणार आहे. ऑल इंडिया फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनने (AFDLHF) यासंदर्भात महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभागाला पत्र लिहले आहे. त्यात अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अथॉरिटीने (एफडीए) एक पत्रक प्रसिद्ध केले असून त्यात MDH या कंपनीच्या एका उत्पादनात साल्मोनेला हा विषाणू सापडल्याचे नमूद केले आहे.

या पत्रात एमडीएचच्या सांबार मसाल्यात साल्मोनेला हा विषाणू आढळल्यानंतर अमेरिकेने या कंपनीचे सर्व मसाले परत पाठवल्याचे स्पष्ट केले आहे. सांबार मसाल्यात विषाणू आढळल्याची तक्रार आल्यानंतर एफडीएने या मसाल्यांच्या काही चाचण्या केल्या. त्यात विषाणू असल्याचे निदर्शनास आले. हे विषाणू शरीरास अपायकारक असल्याने एमडीएच कंपनीच्या मसाल्यांचे तीन लॉट हिंदुस्थानात परत पाठवण्यात आले. हे विषाणू असलेले खाद्य पदार्थ खाल्यानंतर 12 ते 72 तासात व्यक्तीला उलट्या, जुलाब, पोटात कळा येणे यासारखा त्रास होऊ लागतो. योग्यवेळी उपचार केल्यानंतर चार ते सात दिवसांनी आराम मिळतो. पण हा विषाणू असलेले पदार्थ खाल्ल्याने वयस्कर व्यक्ती, नवजात बालके, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना जास्त त्रास होतो.