
निवती भोगवे समुद्रात मासेमारी करणारी मालवण दांडी (मोरेश्वर वाडी) येथील मोरेश्वर प्रसाद ही मासेमारी बोट समुद्री लाटांच्या तडाख्यात शुक्रवारी सकाळी बुडाली. मासेमारी नौकेतील चारही मच्छीमार सुदैवाने बचावले. मात्र, नौकेच्या इंजिनसह जाळ्यांचे एक लाखाहून अधिकचे नुकसान झाले आहे.
मालवण दांडी मोरेश्वर वाडी येथील राजन राधाकृष्ण भगत हे आपली मोरेश्वर प्रसाद ही बोट घेऊन पहाटे चार वाजण्याच्या सुमारास निवती भोगवे समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुले मनीष, गणेश आणि काका शिवलिंग होते. निवती भोगवेच्या समुद्रात पापलेटची जाळी फेकल्यानंतर सुमारे दोन तासाच्या कालावधीनंतर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक समुद्रात उसळलेल्या मोठ्या लाटेत नौका समुद्रात उलटली. त्यामुळे चारहीजण बाहेर फेकले गेले. त्यांनी लाटांचा सामना करीत त्यांनी बोटीला घट्ट पकडून ठेवले. त्य़ावेळी समुद्रात आलेल्या मोठ्या लाटेत नौकेसह चारही मच्छीमार समुद्रकिनाऱ्यावर वाहून आले. समुद्रकिनाऱ्यावर आल्यावर त्यांनी स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मालवण दांडी येथील सुंदर चांदेरकर यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. नवीन मशिनरी घेऊन निवती येथे बोलावले. त्यांनंतर नवीन मशीन त्या नौकेला बसवून चारही मच्छीमार पुन्हा दांडी येथे आले. मत्स्यदुष्काळाच्या झळा व वाढत्या समुद्री संकटांमुळे पारंपरिक मच्छीमार मोठ्या संकटात सापडला आहे.























































