>> शिल्पा सुर्वे
आत्मनिर्भरता हा शब्दही माहीत नसलेला तो काळ. ज्या काळात महिलांनी स्वतŠचा विचार करणं, एखाद्या कलेची जोपासना करणं वा स्व-कमाईसाठी घराबाहेर पडणं या गोष्टी समाजासाठी कल्पनेपलीकडच्या होत्या. त्या काळात एखादी महिला फोटोग्राफीसारखं क्षेत्र निवडतेंआणि या क्षेत्रातील पुरुषी मक्तेदारी मोडीत काढत स्वत:चं आगळं स्थान निर्माण करते, ही गोष्ट इतिहासात नोंद करण्यासारखीच. निर्भीडपणे हे पाऊल उचलणाऱया देशातील पहिली महिला फोटो जर्नालिस्ट म्हणजे होमी व्यारावाला.
तो काळ पारतंत्र्याचा होता… महिलांना सामाजिक बंधनात जखडून ठेवणारा… पैसे कमवण्यासाठी महिलांनी घराबाहेर पडणे ही कल्पनाच समाज स्वीकारू शकत नव्हता. त्यातही स्वतःच्या मालकीचा कॅमेरा विकत घेऊन तो खांद्यावर अडकवून फोटो काढण्यासाठी एखाद्या बाईने घराबाहर पडणं ही तर अशक्यप्राय गोष्ट होती. होमी व्यारावाला या पारशी महिलेने फोटोग्राफी क्षेत्रातील पुरुषांची मत्तेदारी मोडीत काढली. देशातील पहिली महिला फोटो जर्नलिस्ट म्हणून होमी यांची नोंद झाली. हिंदुस्थानच्या जडणघडणीत अनेक महत्त्वपूर्ण घटनांचे साक्षीदार होण्याचे आणि ते क्षण कॅमेऱयात टिपण्याचे भाग्य त्यांना लाभले.
होमी व्यारावाला यांचा जन्म 13 डिसेंबर 1913 रोजी गुजरातमधील नवसारी येथे पारशी कुटुंबात झाला. होमींचे छायाचित्रकलेचे शिक्षण आणि जडणघडण मुंबईतच झाले. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. 1930 ते 1970 हा त्यांच्या पत्रकारितेचा बहराचा काळ होता. मनेक्षा व्यारावाला यांच्याशी लग्न झाल्यावर खऱया अर्थाने होमी यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. लग्नानंतर पतीसोबत दिल्लीला स्थायिक झाल्यावर त्यांनी ब्रिटिश सूचना सेवा विभागात फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. तिथेच त्यांचे फोटोग्राफी करीअर सुरू झाले. दिल्लीला आल्यावर त्यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. त्यांनी 1942 साली ‘भारत छोडो‘ आंदोलनात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिना यांची काढलेली अनेक चित्रे चर्चेत राहिली. होमी यांनी ‘डालडा’ या टोपण नावाने फोटो प्रकाशित केले. त्यामागे रंजक कथा होती. होमी यांचा जन्म 1913 साली झाला. पतीसोबत त्यांची पहिली भेट 13व्या वर्षी झाली होती. त्यांच्या गाडीचा नंबर होता डी.एल.डी. 13. त्यावरून त्यांनी ‘डालडा’ हे टोपणनाव धारण केले.
होमी यांच्या छायाचित्रांनी हिंदुस्थानातील तत्कलीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे दर्शन घडवले. 16 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा फडकलेला तिरंगा, लॉर्ड माऊंटबॅटन यांचे देश सोडून जाणे, लालबहादूर शास्त्राr यांची अंत्ययात्रा ही ऐतिहासिक छायाचित्रे त्यांनी काढली. स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रत्येक हिंदुस्थानीच्या डोळ्यात दिसणारी स्वातंत्र्याची आस आणि स्वातंत्र्योत्तर काळात पदरी पडलेली निराशा हा प्रवास त्यांनी टिपला.
सगळे फोटोग्राफर जेव्हा एका व्यक्तीच्या मागे धावायचे, जेव्हा आपल्या कॅमेऱयाबद्दल कॉन्शिअस व्हायचे तेव्हा होमी निश्चिंत असायच्या, आपल्या जागी स्थिर असायच्या. विषयाला स्वतःच्या मनात फ्रेम करायच्या आणि क्लिक करायच्या. म्हणूनच पंडित नेहरूंनी बहीण विजयालक्ष्मी पंडीत यांना दिलेले आलिंगनाचे छायाचित्र खूपच खास ठरले. होमी यांच्या कॅमेऱयात कैद झालेले सिगारेट ओढणारे नेहरू आणि तत्कालीन ब्रिटिश उच्चायुक्तांच्या पत्नी सिमोन यांची मदत करणारे नेहरू, अशी छायाचित्रे देशाच्या पंतप्रधानांचे वेगळेच रूप दाखवणारी ठरली. पंडित नेहरू हे होमी यांच्या फोटोग्राफीचे आवडते मॉडेल होते, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. ‘पंडित नेहरूंच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी नेहमी उपस्थित रहायचे, तू इथं पण आलीस?‘, मला बघितल्यावर नेहरू विचारायचे… एका मुलाखतीत होमी यांनी ही आठवण सांगितली होती. होमींच्या फ्लॅश मारण्यावरून महात्मा गांधी काहीसे नाराज झाले होते. ही मुलगी मला आंधळी केल्याशिवाय राहणार नाही, असे गांधीजींनी म्हटले होते.
गांधी हत्येचा दिवस… 30 जानेवारी 1948 रोजी नवी दिल्लीच्या बिर्ला हाऊसमध्ये होमी पोहोचू शकली नाही. मात्र त्यानंतर गांधीजींच्या अस्थिविसर्जनावेळी त्या तिथे होत्या. गांधीजींच्या अस्थी ट्रेनने अलाहाबादला नेण्यात येत होत्या. शोकाकुल जमावाबरोबर होमीने तृतीय श्रेणीच्या डब्यातून प्रवास केला. त्यांनी प्लॅटफॉर्मवर उभे राहून कॅमऱयाचा अँगल लावला. शोकाकुल जमाव मोठय़ा संख्येने लोटला होता. होमी चारी बाजूंनी गर्दीने घेरल्या गेल्या. ट्रेनमागे लाखो अनुयायी धावत होते. हातात फडकणारा तिरंगा, शिष्यांचा आक्रोश, शोकाकुल नेते… महात्मा गांधींच्या अस्थी अलाहाबादच्या संगमात सोडण्याच्या प्रसंगाच्या त्या साक्षीदार होत्या…
होमीच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीत जिवंतपणा असायचा, वैविध्यता असायची. दिवसा प्रकाशात लो अँगल शॉट आणि छबींच्या विस्तारासाठी बॅक लाईटचा वापर त्या खुबीने करायच्या. त्यामुळे विषय वस्तूची गहनता त्यांच्या छायाचित्रात उठून दिसायची. पतीच्या मृत्यूनंतर होमी यांनी करीयरमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर 40 वर्षे आपल्या कॅमेऱयाला हात लावला नाही, अगदी मुलाच्या लग्नातही फोटोग्राफी केली नाही. कारकिर्दीच्या शिखरावर असताना फोटोग्राफी का सोडली, असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, फोटोग्राफी करण्याचे आता कोणतेही औचित्य उरले नाही. आमच्या पिढीच्या छायाचित्रकारांची जीवनविषयक मूल्यं, तत्त्व होती. सहकारी म्हणून आम्ही एकमेकांना प्रेम- सन्मान देत होतो. मात्र अचानक सारंच बदललं. नव्या पिढीचा प्राधान्यक्रम बदलला. ही पिढी पैशाच्या मागे धावू लागली. त्या कार्यपद्धतीचा भाग मला बनायचे नव्हते.
आयुष्याच्या अखेरपर्यंत होमी स्वावलंबी आयुष्य जगल्या. मुलगा फारूखच्या मृत्यूनंतरही हा बाणा त्यांनी सोडला नाही. शिवणकाम, सुतारकाम, अगदी प्लंबिंगसारखी कामे स्वतःच करायच्या. पुढे होमी यांनी अनमोल छायाचित्रे दिल्ली येथील अल काझी फाऊंडेशन ऑफ आर्ट या संस्थेला चॅरिटी म्हणून दिली. 2010 साली मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये त्याचे प्रदर्शनही भरले होते. त्यांना सरकारने 2011मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. 15 जानेवारी 2012 रोजी या ‘फर्स्ट लेडी ऑफ द लेन्स‘ने बडोदा येथे अखेरचा श्वास घेतला.




























































