विकासाच्या नावाखाली मुंबईचे फुप्फुस तोडू नका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘आरे’तील ‘मेट्रो’ कारशेडसाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने 2700 झाडे तोडण्यास मंजुरी दिली असली तरी ही झाडे वाचवण्याची जोरदार मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. शिवसेनेच्या या भूमिकेला पाठिंबा देताना हजारो मुंबईकरांसह विद्यार्थी-युवकांनी ‘मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा वापरा, ‘आरे’ वाचवा’ अशी मागणी केली आहे. मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांतील हजारो नागरिकांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.

‘मेट्रो-3’च्या कारशेडसाठी गोरेगाव पूर्व ‘आरे’तील तब्बल 2702 झाडे तोडण्यात येणार आहेत. यातील 2238 झाडे तोडण्यात येणार असून 464 झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला शिवसेनेने वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत जोरदार विरोध केला. मात्र बहुमताच्या जोरावर झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या विरोधात हजारो मुंबईकरांनी ‘सेव्ह आरे’ मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘काश’ फाऊंडेशनच्या सहकार्याने मुंबईच्या विविध भागांत, विविध क्षेत्रांतील नागरिकांना मेट्रो कारशेडबाबत प्रश्न विचारून सर्वेक्षण केले. यामध्ये सर्व प्रकारच्या प्रश्नांना उत्तरे देताना नागरिकांनी ‘मेट्रो’ कारशेडमुळे ‘आरे’तील जैवविविधता आणि जनजीवनाला धोका पोहोचणार असल्याचे म्हटले आहे. याबाबतच्या सर्वेक्षणाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांनी दिली. यावेळी पालिकेचे माजी नामनिर्देशित सदस्य प्रा. अवकाश जाधव, विद्यार्थिनी स्टेफी पिंटो, खुशबू मैन आदी उपस्थित होते.

वनस्पती तज्ञांची आयुक्तांकडून पाठराखण 

दरम्यान, वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत वनस्पती तज्ञांनी झाडे तोडण्याच्या बाजूने मतदान करण्यासाठी 50 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर वनस्पती तज्ञ डॉ. शशिरेखा सुरेश कुमार यांनी सदस्यपदाचा राजीनामाही दिला होता. याबाबत संबंधित वनस्पती तज्ञांनी आयुक्तांना पत्र देऊन आरोप फेटाळून लावत नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आज वनस्पती तज्ञांनी पैसे घेतल्याचा आरोप फेटाळून लावत वनस्पती तज्ञांची पाठराखण केली.

सर्वेक्षणात नागरिक म्हणतात…

  • राज्य शासनानेच नेमलेल्या ‘त्री-सदस्यीय’ समितीने कांजुरमार्ग येथे जागा सुचवली असताना ‘आरे’तील जागेचा अट्टहास का धरला जात आहे?
  • 81 टक्के नागरिकांनी ‘मेट्रो’ कारशेडसाठी मुंबईचे फुप्फुस असलेल्या आरेतील झाडे तोडू नका असे मत नोंदवले.
  • ‘आरे’मध्ये मुबलक जैवविविधता असल्याचे 59 टक्के लोक म्हणतात
  • उपलब्ध नैसर्गिक स्रोत वाचवले पाहिजेत असे 80 टक्के लोकांचे मत
  • नागरिकांच्या सूचना-हरकतींवर पालिकेने समाधानकारक उत्तर दिले नसल्याचे मत 59 नागरिकांनी नोंदवले.
  • ‘आरे’तील झाडे तोडल्याने मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडेल असे मत 47 टक्के नागरिकांनी व्यक्त केले.
  • मेट्रो कारशेड पर्यायी जागी बांधावी असे मत 59 लोकांनी व्यक्त केले. यात 35 टक्के लोकांनी कांजुरमार्गच्या जागेला पसंती दिली.
  • ‘आरे’ला नॉन डेव्हलपमेंट झोन, नॉन कमर्शिअल झोन बनवून वाचवले पाहिजे, असे मत 64 टक्के लोकांनी व्यक्त केले.
  • जैवविविधता आणि पर्यावरणाच्य संवर्धनासाठी आरे वाचवले पाहिजे, असे मत 63 टक्के नागरिकांनी व्यक्त केले.