
मुंबईत अतिवृष्टी सुरू असताना अनेक ठिकाणी तुंबणारे पाणी साठवण्यासाठी पालिका भूमिगत जलबोगदे तयार करणार आहे. हे साठलेले पाणी नंतर समुद्रात सोडले जाणार आहे. पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबईकरांची पाणी तुंबण्यातून सुटका होणार आहे. टोकियोच्या धर्तीवर होणाऱ्या या उपक्रमाबाबत जपानी कंपनीने आज पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना सविस्तर सादरीकरण केले.
मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असताना शहराची भौगोलिक स्थिती आणि समुद्राला भरती असल्यास अनेक भागांत पाणी साचल्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये टोकियोमध्ये राबवण्यात येणारा ‘भूमिगत जलबोगदा’ उपक्रम मुंबईतही राबवण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. यासाठी या कामाचा अनुभव असलेल्या जपानी कंपनीच्या अधिकारी-तज्ञांनी प्रस्तावित प्रकल्पाचे सादरीकरण केले. यामध्ये भूमिगत जलबोगद्यात साठवलेले पाणी समुद्रात सोडण्याच्या पर्यायाबरोबरच पिण्यासाठी वापरता येऊ शकते का, याबाबत अभ्यास करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधितांना यावेळी दिल्या आहेत. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, उपायुक्त कुकुनूर, पर्जन्य जलवाहिन्या खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे, जपानमधील संबंधित संस्थेचे महाव्यवस्थापक योशिताका तोयोसू, तंत्रज्ञान व्यवस्थापक ताकेशी आदी अधिकारी उपस्थित होते.
मिठी नदी, तलावांचा मंगळवारी अभ्यास दौरा
भूमिगत जलबोगदा उपक्रमासाठी जपानच्या पॅसिफिक कन्सल्टंट कंपनीचे तज्ञ पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत पवई, विहार, तुळशी तलाव आणि मिठी नदीचा अभ्यास दौरा करणार आहेत. या अभ्यास दौऱ्यानंतर पालिकेला ते अहवाल सादर करतील. यानंतर जलबोगदा प्रकल्प राबवण्याबाबत तातडीने कार्यवाही सुरू होणार आहे.


























































