
प्रभू रामचंद्र हे ‘इमाम-ए-हिंद’ होऊ शकतात, मात्र त्यांना न्यायिक पक्षकार कसे काय बनवले जाऊ शकते, असा सवाल मंगळवारी सर्वोच्च न्यायालयातील अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुस्लिम पक्षाने उपस्थित केला. मुस्लिम पक्षकारांच्या वतीने ऍड. राजीव धवन यांनी हा युक्तीवाद केला.
अयोध्या प्रकरण न्यायालयाबाहेर तडजोडीने मिटवण्याबाबत सुन्नी वक्फ बोर्ड आणि निर्मोही आखाडय़ाने मध्यस्थी समितीला पत्र लिहिले आहे. त्यामुळे हे प्रकरण नव्या वळणावर आले आहे. याचदरम्यान सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी सुरू आहे. हिंदू पक्षकारांनी अयोध्येतील जागा रामजन्मभूमीच असल्याचा ठोस दावा करत आपले युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर आता या प्रकरणात मुस्लिम पक्षकारांच्या वतीने बाजू मांडली जात आहे. मंगळवारी ऍड. धवन यांनी युक्तिवाद करताना प्रभू रामचंद्र यांना न्यायिक पक्षकार बनवण्यावर आक्षेप घेतला. भगवान कृष्ण यांचा जन्मदिवस जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. परंतु कृष्ण न्यायिक व्यक्ती नाही, असे ऍड. धवन यांनी न्यायालयाला सांगितले.
न्यायालयात ऐकवली शायरी
ऍड. धवन यांनी न्यायालयात उर्दू कवी अल्लामा इकबाल यांची प्रसिद्ध शायरी ऐकवली. ‘है राम के वजूद पे हिन्दोस्ताँ को नाज अहल-ए-नजर समझते है उस को इमाम-ए-हिंद’ ही शायरी न्यायालयात ऐकवताना ऍड. धवन यांनी जन्मभूमीला न्यायीक पक्षकार बनवण्यास मात्र विरोध दर्शवला.
























































