भाट्ये बीचवर ‘आय लव्ह रत्नागिरी’ सेल्फी पॉइंट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bhatye-beach-ratnagiri

अथांग समुद्रकिनारा तसेच निर्सगाने नटलेल्या रत्नागिरी जिह्यातील विविध पर्यटन स्थळे नेहमीच पर्यटकांना भुरळ घालतात. सौंदर्याने नटलेल्या या जिह्याच्या सौंदर्यात लवकरच आणखी एका सौंदर्याची भर पडणार आहे.

रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या संकल्पनेतून लवकर रत्नागिरीतील भाटय़े बीचवर ‘आय लव रत्नागिरी’ हा सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहे. नावीन्यपूर्ण योजनेतून या सेल्फी पॉइंटला पालकमंत्री यांनी मंजुरी दिली आहे. जिल्हा नियोजनमधील नावीन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून जिह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी रत्नागिरी जिह्याला नवीन रूप देण्याचाही प्रयत्न केला. यात ऑक्टिव्हिटी सेंटर, ओपन जिम, नेहरू तारांगणाच्या धर्तीवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण, रत्नागिरी, चिपळूण तसेच लांजा येथील एस.टी स्थानकाचे नूतनीकरण, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वॉटर प्युरिफायर मशीन बसविले, पर्यटन स्थळांचा विकास, जिह्यात सी.सी. टीव्ही कॅमेरे बसविणे अशा एक ना अनेक सोयीसुविधा देऊन जिह्याचा विकास केला.

जिल्हा नियोजनमधील नावीन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून 2019-20 या वर्षासाठी जिह्याच्या पर्यटनात वाढ व्हावी तसेच जिल्हावासीयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अजून नवीन योजनांना मंजुरी दिली आहे. यात रत्नागिरी येथे नावीन्यपूर्ण योजनेतून ‘आय लव्ह रत्नागिरी’ सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहे. तसेच भाटय़े बीचवर ‘गझिबो’ उभारण्याबरोबरच त्या बाजूचा परिसर सुशोभीकरणासाठी रुपये 50 लाख मंजूर केले आहेत. तसेच या बीचवर येणाऱया पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच रत्नागिरी शहरात अनुक्रमे सुसज्ज पोलीस चौकी तसेच सी.सी. टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पोलीस चौकीसाठी रुपये 50 लाख तर सी.सी.टीव्ही कॅमेऱयासाठी रुपये 50 लाख मंजूर केले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या 100 फुटी राष्ट्रध्वजाच्या सभोवतालील परिसराच्या सुशोभीकरणासाठी रुपये 25 लाख तसेच कसबा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळय़ासभोवतालील विद्युतीकरण तसेच हायमास्ट लाइटची व्यवस्था करण्याच्या कामासाठी रुपये 25 लाख रुपयांच्या निधीला रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मंजुरी दिली आहे.