आजपासून महायुतीची विजययात्रा सुरू होईल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत गुरुवारी महाजनादेश यात्रेचा नाशिकमध्ये समारोप होईल आणि तेव्हापासूनच महायुतीची विजययात्रा सुरू होईल. महाराष्ट्र विधानसभेवर महायुतीचा झेंडा फडकवूनच या विजययात्रेचा समारोप करू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे नाशिकमधील पाथर्डी फाटा येथे बुधवारी सायंकाळी 5 वाजता आगमन झाले. तेथून निघालेल्या यात्रेच्या ‘रोड शो’ची सांगता पंचवटी कारंजा येथे रात्री साडेसात वाजता करण्यात आली. या यात्रेचा समारोप गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेने नाशिकमध्ये होणार असल्याने मी भाषण करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. यानंतर ते म्हणाले की, या यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, नाशिककरांनीही उत्स्फूर्त स्वागत केले, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. या यात्रेचा समारोप जरी गुरुवारी होणार असला तरी तेव्हापासूनच महायुतीच्या विजययात्रेला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्राच्या विधानभवनावर महायुतीचा झेंडा फडकवून विजययात्रेचा आपण समारोप करू, असे सांगून तुमचा जनादेश आहे का, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मला, भूपेंद्र यादव यांना, पालकमंत्री गिरीष महाजन यांना, आमच्या आमदारांना आणि महापौरांना तुमचा आशीर्वाद आहे का, असाही प्रश्न त्यांनी जनसमुदायाला विचारला. आणि या जनसमुदायाने हो.. हो म्हणत प्रतिसाद दिला. तुमचा आशीर्वाद हाच जनादेश समजतो, असेही ते म्हणाले. समारोपानंतर मी मुंबईला जाईल. विधानसभेच्या विजयानंतर पुन्हा नाशिकमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाला येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

यावेळी रथावर पालकमंत्री गिरीष महाजन, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल, आमदार सिमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, गिरीष पालवे हेही होते. यावेळी उपमहापौर प्रथमेश गीते, लक्ष्मण सावजी, विजय साने, वसंत गीते, सुनील बागुल, दादा जाधव, सतिश सोनवणे, उद्धव निमसे, दिनकर पाटील आदींसह पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.‘

ठिकठिकाणी जोरदार स्वागत

महाजनादेश यात्रेला आज सायंकाळी 5 वाजता पाथर्डी फाटा येथून सुरुवात झाली. ठिकठिकाणी दुतर्फा भाजपा कार्यकर्ते व नागरिकांनी यात्रेचे जोरदार स्वागत केले. अंबड लिंक रोड, उत्तमनगर, पवननगर, त्रिमूर्ती चौक, मायको सर्कल, त्र्यंबक नाका, गंजमाळ सिग्नल, शालिमार, नेहरू गार्डन, मेनरोड मार्गे रविवार कारंजा असा यात्रेचा मार्ग होता. पंचवटी कारंजा येथे यात्रेची सांगता झाली. शालिमारकडे जात असतानाच पावसाने हजेरी लावली. मात्र, भरपावसातही यात्रा पुढे मार्गस्थ झाली. हा संपूर्ण मार्ग स्वागताचे होर्डिंग्ज् आणि झेंडे यांनी सजला होता. ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. चौकाचौकात ढोलताशांचा गजर होत होता. भाजपा पदाधिकाऱ्यांनी क्रेनद्वारे रथावर पुष्पवृष्टी केली, तसेच मुख्यमंत्र्यांना पुष्पहार घालून स्वागत केले.