विधानसभा निवडणुक दोन टप्प्यात घेऊन खर्चाची मर्यादा 40 लाखांपर्यंत वाढवा, शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena-logo-new

महाराष्ट्राचा भौगालिक विस्तार लक्षात घेता राज्यात दोन टप्प्यांत विधानसभेचे मतदान घेण्यात यावे. तसेच विधानसभा निवडणुकीतील खर्चाची मर्यादा किमान 40 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची जोरदार मागणी शिवसेनेच्या वतीने बुधवारी केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडे करण्यात आली. दिवाळीच्या सुट्टीमध्ये अनेकजण पर्यटनाला बाहेरगावी जातात. त्यामुळे दिवाळीपूर्वी राज्यात विधानसभा निवडणूक घेण्याची सूचनाही शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. शिवसेनेच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिले.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मुख्य निवडणूक अशोक अरोरा यांच्यासह निवडणूक आयुक्त अशोक लवासा तसेच सुशील चंद्रा व आयोगाचे चार उपनिवडणूक आयुक्त मुंबईच्या दौर्‍यावर आले आहेत. ‘सन्ह्याद्री’ अतिथीगृहावर आयोजित बैठकीत त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी, जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकार्‍यांसोबत विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली.

निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवा

यावेळी शिवसेनेच्या वतीने खासदार अनिल देसाई यांनी मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यात निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याची प्रमुख मागणी यावेळी त्यांनी केली. विधानसभा निवडणुकीत खर्चाची मर्यादा सध्या 28 लाख रुपये आहे, पण ही मर्यादा 40 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची जोरदार मागणी यावेळी खासदार अनिल देसाई यांनी केली. ते म्हणाले की, प्रत्येक उमेदवाराला त्याच्या विरोधात असलेल्या गुन्ह्यांची माहिती वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावी लागते तसेच टीव्ही चॅनेलवर तीन वेळा दाखवावी लागते. यामध्ये उमेदवाराचे 10 ते 15 लाख रुपये खर्च होतात. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक प्रचारावर खर्च करण्यास निधी अतिशय अपुरा शिल्लक राहतो. त्याशिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमी व राजकीय गुन्ह्यांमधील फरक निश्चित करण्याची सूचनाही करण्यात आली.

दिवाळीपूर्वी निवडणूक घ्या!

यंदा ऑक्टोबरच्या चौथ्या व पाचव्या आठवड्यात दिवाळी आहे. दिवाळी सुट्टीच्या काळात अनेकजण पर्यटनाला बाहेरगावी जातात. जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी दिवाळीच्या पूर्वी मतदान घेण्याची मागणीही यावेळी शिवसेनेने केली.

प्रमाणित जाहिरात

निवडणूक रिंगणातील उमेदवाराला जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रमाणित समितीकडून (सर्टिफिकेशन कमिटी) ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. पण या समितीतील सदस्य त्यांच्या वेळेनुसार उपलब्ध असतात. त्यामुळे वेळेवर जाहिरात प्रसिद्ध करता येत नाही. परिणामी या समितीचे काम 24 तास सुरू ठेवण्याची सूचनाही केली. शिवसेनेच्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन निवडणूक आयुक्तांनी दिल्याचे खासदार अनिल देसाई म्हणाले. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेनेचे प्रवीण महाले उपस्थित होते.

मतदार याद्या अचूक करा

मतदार याद्या अनेकदा सदोष असल्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागते. अनेक मतदार एका मतदान केंद्रातून दुसर्‍या मतदान केंद्रात वणवण फिरतात. पण यादीमध्ये अचूक नाव नसल्यामुळे मतदान करता येत नाही. त्यामुळे मतदान याद्या अचूक करण्याची मागणी शिवसेनेने केली.

राष्ट्रवादीही आग्रही

निवडणूक खर्चाची मर्यादा 60 लाख रुपयांपर्यंत नेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निवडणूक आयुक्तांकडे करण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. निवडणूक प्रचारसभा व पदयात्रांची परवानगी 24 तास अगोदर दिली जाते, पण त्यातून अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे प्रचारसभांची परवानगी 48 तास अगोदर देण्याची सूचना केली. मतदार याद्यांमध्ये मतदाराचे फोटो नसतात. त्यामुळे बोगस मतदान टाळण्यासाठी मतदाराची बारकाईने ओळख पटवण्याची सूचना राष्ट्रवादीने केली.

बोगस मतदार वगळा

विधानसभा निवडणूक मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकेवर घेण्याची तसेच राज्यातील मतदार यादीतील 44 लाख 61 हजार बोगस मतदारांची नावे तातडीने वगळण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने यावेळी करण्यात आली. त्यावर 2 लाख 16 हजार बोगस मतदारांची नावे यादीतून वगळल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिली.