
अधूनमधून वादग्रस्त विधान करून चर्चेत राहणारे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांना मंदिरासंबंधी केलेल्या विधानाने चांगलेच गोत्यात आणले आहे. गुरुवारी मध्य प्रदेशात हिंदू संघटनांनी सिंह यांचा निषेध करत मंदिराची दारे बंद करण्यासाठी पोस्टरबाजी केली, तर उत्तर प्रदेशमध्ये सिंह यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. भगवी वस्त्र परिधान करून बलात्कार केले जाताहेत, मंदिरात बलात्कार होताहेत अशी बेताल वक्तव्ये करून दिग्विजय सिंह यांनी स्वतःचा पाय खोल खड्ड्यात टाकला आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानाचा देशाच्या विविध भागांतून निषेध केला जात आहे. भोपाळच्या परशुराम मंदिराच्या बाहेर हिंदू समाजातर्फे पोस्टरबाजी करून सिंह यांना मंदिरात न घेण्याची मागणी करण्यात आली, तर उत्तर प्रदेशात कुशीनगरचे आमदार रजनीकांत मणी यांचे पुत्र दिव्येंदू मणी यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. आपल्यावर चौफेर टीका होऊ लागल्यानंतर सिंह यांनी ट्विटरवर स्वतःच्या विधानाचे स्पष्टीकरण दिले. हिंदू संत आमच्या सनातन आस्थेचे प्रतीक असल्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या वागण्याची अपेक्षा आहे, असे ट्विट त्यांनी केले.



























































