
गेल्या पाच वर्षांत विक्रोळी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या माध्यमातून विकासकामांचा डोंगर रचला आहे. आमदार सुनील राऊत यांनी वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न मार्गी लावले आहेत. सर्वसामान्यांना ते सहज उपलब्ध असतात. त्यामुळे विरोधक कोणताही असो, विक्रोळीत पुन्हा शिवसेनेचाच भगवा फडकणार, असा एकच निर्धार गुरुवारी शिवसैनिकांनी केला.
कांजुरमार्ग येथे शिवसैनिकांचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्याला शिवसैनिकांनी तुडुंब गर्दी केली होती. विक्रोळी विधानसभेत विविध ठिकाणी आठ एलईडी क्रीनवर आणि यूटय़ूबवरदेखील मेळाव्याचे थेट प्रक्षेपण झाले. मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी आणि मनसेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या मेळाव्याला शिवसेना उपनेते, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विभागप्रमुख रमेश कोरगावकर, नगरसेविका सुवर्णा करंजे, म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, नाशिक देवळाली संपर्कप्रमुख संगीता नवले, विभागसंघटक संध्या वढावकर यांनी आपल्या भाषणात आपलाच विजय निश्चित असला तरी गाफील राहू नका, घराघरात जाऊन प्रचार करा, असे मार्गदर्शन शिवसैनिकांना केले. यावेळी नगरसेवक उपेंद्र सावंत, राजराजेश्वरी रेडकर, उपविभागप्रमुख अनंत पाताडे, उपविभाग संघटक रश्मी पहुडकर, सिद्धी जाधव, स्नेहल मांडे, विश्वास शिंदे, चंद्रशेखर जाधव आदी उपस्थित होते. विभागातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव उपलब्ध असतो. गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. यापुढील काळातही शिवसेनेच्या माध्यमातून जनतेसाठी सदैव कार्यरत राहीन, असे आमदार सुनील राऊत यावेळी म्हणाले.
वाघासमोर कोल्हे टिकत नाहीत!
अभिनेते दिगंबर नाईक यांनी शिवसेना सोडून गेलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर यावेळी निशाणा साधला. डॉ. अमोल कोल्हे शिवसेना सोडून गेले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. कारण वाघासमोर कोल्हे कधीच टिकत नाहीत. भगवा झेंडा हातात घेण्यासाठी धमक लागते. हे ऐऱ्यागैऱ्यांचे काम नाही, अशा खरपूस शब्दांत अमोल कोल्हेंवर निशाणा साधला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कुणालाही मदत करताना जात, धर्म असा भेदभाव कधीच केला नाही. सर्वसामान्य शिवसैनिक त्यांच्यासाठी नेहमीच महत्त्वाचा होता, असेही ते पुढे म्हणाले.
सर्वसामान्यांना असामान्य बनवण्याची ताकद शिवसेनेत!
शिवसेना म्हणजे शिस्तबद्ध, वचनबद्ध, सेवाभावी आणि नार्मदांना जिथे स्थान नाही अशी संघटना आहे. सर्वसामान्यांना असमान्य बनवण्याची ताकद शिवसेनेत आहे. त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आज मंत्रीपद मिळाल्याची भावना शिवसेना उपनेते, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. शिवसेना सोडून गेलेल्यांवर आज काय वेळ आली आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. शिवसेनेला संपवायची भाषा करणारे किती आले आणि किती गेले; पण सर्वसामान्य शिवसैनिकांनी कधीच शिवसेनेची साथ सोडली नाही, असे सांगतानाच विक्रोळी विधानसभेत सुनील राऊत यांना 50 हजारांहून अधिक मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.






























































