आपण नदीला काय दिले?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रतीक राजूरकर

हिंदुस्थानला 400 हून अधिक नद्यांचे नैसर्गिक वरदान आहे. त्यातील मुख्य 14 नद्या या 80 टक्के नागरिकांचे मुख्य जलस्रोत आहेत. शेती, पिण्याचे पाणी यासारख्या दैनंदिन पाण्याची गरज नद्या पूर्ण करताहेत, परंतु मुख्य जलस्रोत असलेल्या नद्यांचा प्रवाह खंडित झाला आहे. हे करताना तिचा श्वास कोंडला जात आहे, हे आत्ताच जाणून घेत उपाय शोधले पाहिजेत.

जागतिक नदी दिवसाची संकल्पना 2005 साली सुरू झाली. ब्रिटिश नागरिक असलेले नदी संवर्धक मार्क एंजिलो यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या जीवनासाठी ‘जल शताब्दी’ या उपक्रमाला पाठिंबा म्हणून ही संकल्पना मांडली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंगीकृत संस्थांनी या संकल्पनेला प्रतिसाद दिला. जगभरात सप्टेंबर महिन्यातील चौथा रविवार ‘जागतिक नदी दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

6625 कि.मी प्रदेशात विस्तारलेली इजिप्तची नाईल नदी जगातील सर्वात मोठी नदी म्हणून नावलौकिक आहे. इजिप्तमधील वाढती लोकसंख्या, धरणं यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अभ्यासकांच्या मते नाईल नदीची दुरवस्था 2025 साला पर्यंत इजिप्तमधील 60 टक्के अन्न उत्पादनावर दुष्परिणामकारक ठरेल. जागतिक स्तरावरील दहा धोकादायक स्थितीत असलेल्या नद्यांच्या यादीत एकटय़ा आशियातील पाच नद्यांचा समावेश आहे. हिंदुस्थानातील गंगा नदीचासुद्धा यादीत समावेश आहे. ागाचा 70 टक्के भाग पाण्याने व्यापला असला तरी केवळ 3 टक्के जलसाठा हा शुद्ध आहे. त्यातही 2.6 टक्के शुद्ध पाणी हे मानवाच्या आवाक्यात नाही तर बर्फात, ग्लेशियर, वातावरणात अथवा जमिनीत खोलवर आहे. त्यामुळे केवळ 0.4 टक्के पृथ्वीवरील पाणी हे सात अब्ज लोकांच्या वापरात आणि पिण्यासाठी उपयोगाचे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या माहितीनुसार लोकसंख्येमुळे पाण्याचा वापर दुपटीने वाढल्याने 2025 सालापर्यंत जगातील 1.8 अब्ज लोकसंख्या दुष्काळाच्या छायेत असेल.

हिंदुस्थानला 400 हून अधिक नद्यांचे नैसर्गिक वरदान आहे. त्यातील मुख्य 14 नद्या या 80 टक्के नागरिकांचे मुख्य जलस्रोत आहेत. शेती, पिण्याचे पाणी यासारख्या दैनंदिन पाण्याची गरज नद्या पूर्ण करताहेत, परंतु मुख्य जलस्रोत असलेल्या नद्यांचा प्रवाह खंडित झाला आहे. पर्यावरणाच्या धमन्यातून वाहणाऱया नद्यांमुळे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक श्वासोच्छ्वास सुरू आहे. नदीकाठी अनेक शहरे, नगरे वसली. कालांतराने नद्यांची घडी मात्र विस्कटली. देशाच्या नागरीकरणात नद्यांचे योगदान अतुलनीय असेच आहे. हिंदुस्थान हा कृषिप्रधान देश असल्याने नद्यांचे पर्यावरणाइतकेच आर्थिक महत्त्व आहे. हिंदुस्थानातील एकचतुर्थांश प्रदेश व 400 दशलक्ष लोकसंख्येचे पालनपोषण गंगा करत आली आहे. गंगा व यमुना नदी या जिवंत व्यक्ती म्हणून 2017 साली उत्तराखंड उच्च न्यायालयाने निकाल दिला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगनादेश देऊन पुढील कायदेशीर अडचणींना तात्पुरता विराम दिला. कारण उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या निकालाने अनेक कायदेशीर पेचप्रसंग उद्भवले असते. नद्यांना जीवित व्यक्तीचा दर्जा दिल्याने नदीविरोधात खटले दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला असता. दिल्लीतील यमुना नदी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाने मृत घोषित केली आहे. दिल्लीतील यमुनेचा 22 कि. मी. प्रवाह हा एकूण लांबीच्या 2 टक्के आहे, परंतु यमुनेच्या प्रदूषणाची पातळी 70 टक्के असल्याची धक्कादायक बातमी काही वर्षांपूर्वी प्रकाशित झाली होती. याव्यतिरिक्त यमुनेच्या दिल्लीतील परिस्थितीसारखीच परिस्थिती मुंबईच्या मिठी, हिंदोन उत्तर प्रदेश, साबरमती गुजरात, घाग्गर पंजाब, मुसी हैदराबाद, गोदावरी नाशिक, पावना पुणे, सतलज लुधीयाना, भद्रा कर्नाटक, अडयार चेन्नईस्थित नद्यांची आहे.

हिंदुस्थानातील बहुतांशी नद्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. देशातील सर्वात मोठी नदी गंगेपासून तर गावातून जाणाऱया छोटय़ा नदीचे पात्र कुठल्यातरी पौराणिक कथेशी निगडित आहे. नद्यांची मंदिरे, आरती, उपासना, स्तोत्र नामावलीसारख्या पद्धतीने उपासना केल्या जातात. र्स्यू कन्या म्हणून तापी, यमुना नद्यांचे महत्त्व आहे. शनी ग्रहाची बहीण म्हणून तापी तर यमाची बहीण म्हणून यमुना श्रद्धास्थानी आहे. साक्षात महादेवांनी आपल्या मस्तकी गंगेला धारण केले आहे. दक्षिण गंगा म्हणून गोदावरीचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. अनेक योगी ऋषिमुनींनी गोदाकाठी साधना केली आहे. नर्मदा नदी देवांनासुद्धा प्रिय आहे. ईशान्य हिंदुस्थानातील ब्रह्मपुत्रा, ओडिशातील महानदी, पश्चिम घाटातील कृष्णा, कावेरी यांसारख्या हिंदुस्थानातील प्रमुख नद्यांनी देशाची वाटचाल समृद्धतेकडे केली. अनेक उपनद्यांनी मुख्य प्रवाहाचा विस्तार केला. शेकडो लहान नद्यांचे प्रवाह हजारो वर्षांपासून जीवांची तृष्णा तृप्ती करत आले आहेत. अगदी पहिल्या संस्कारापासून अंत्यसंस्कारापर्यंत अनेक संस्कार नदीने आपल्यावर केले आहेत.

आयुष्याच्या प्रवासात नदीचा प्रवाह आपली संगत करत आला आहे. पैलतीरावर जाण्याची ओढ व सातासमुद्रापलीकडे जाण्याचा विरह हे सागर आणि नदीतले अंतर दखल घेण्याजोगे आहे. ग्रामीण भागात नदीच्या प्रवाहात एकरूप झालेले बालपण आजही अनेकांच्या गावाकडल्या स्मृतींचा ओलावा ठेवून आहेत. नदीवर कपडे धुण्यासाठी जाणाऱया महिलांच्या हातातील सुवर्णलंकारांच्या परीसस्पर्शाने दगडांवर सुवर्णाची छाप उमटायची. बारामाही दुथडी भरून वाहणाऱया नद्या आता भूतकाळ झाला आहे. दरम्यान, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. नदीवर तरंगणाऱया बालपणाच्या स्मृतींवर आज कचऱयाचे ढीग तरंगताना दिसल्याने मन सुन्न होते. सध्या राजकीय हेतूने नदीच्या वाटय़ासाठी राज्यात भांडणे सुरू आहेत. सरस्वती नदीचे मूळ अस्तित्व होते की नव्हते यावर चर्चा केल्या जातात, परंतु नदीचे मूळ आणि ऋषींचे कूळ शोधू नये हे ज्ञान विस्मृतीत गेले आहे. सरस्वती नदीच लुप्त नाही झाली तर खऱया अर्थाने विद्या लुप्त झाली आहे. हिंदुस्थानातील आर्थिक, सामाजिक, नैसर्गिक समृद्धीचे प्रतीक असलेल्या नद्यांचा ऱहास आटलेल्या नदी इतका शुष्क भासतो. आजवर नदी आपल्याला काय देते? यावरच चर्चेचा प्रवाह खंडित आहे. आपण नदीला काय दिले? यावर चर्चा सुरू झाल्यास कदाचित नद्यांचा प्रवाह सुरळीत होऊ शकेल.

[email protected]