
मुंबईच्या विविध भागांत गुरुवारी रात्री सुरू झालेल्या गॅस गळतीच्या दुर्गंधीचा शोध लागत नसल्यामुळे शनिवारी पालिका प्रशासनाने ‘आपत्कालीन कक्ष’, ‘आयआयटी’, ‘एनडीआरएफ’ आणि तेल-गॅस कंपन्यांची समिती नियुक्त केली आहे. ही समिती येत्या चार दिवसांत गॅस गळतीच्या प्रकाराची तपासणी करून अहवाल सादर करणार आहे. यामध्ये ही गळती नेमकी कुठे झाली, अशी गळती झाल्यास काय काळजी घ्यावी आणि गळती होऊ नये यासाठीच्या खबरदारीबाबत उपायही सुचवणार आहे.
गुरुवारी रात्रीपासून चेंबूर-घाटकोपरपासून बोरिवली-दहिसरपर्यंतच्या अनेक भागांत गॅस गळतीचा दुर्गंध येऊ लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. अचानक गॅसची दुर्गंधी येऊ लागल्याने शेकडो रहिवाशांनी पालिका, पोलीस आणि आपापल्या विभागातील गॅस कंपन्यांकडे तक्रारी दाखल केल्यामुळे मुंबई अग्निशमन दलासह संबंधित सर्व कंपन्यांनी तक्रारी आलेल्या ठिकाणी जाऊन तपासणी केली, मात्र कुठल्याही यंत्रणेच्या तपासणीत गॅस गळती आढळली नाही. या तक्रारींची गंभीर दखल पालिका प्रशासनाने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी संबंधित प्राधिकरणांची बैठक पार पडली. यावेळी पोलीस प्रशासन, ‘एनडीआरएफ’, ‘आयआयटी’, महानगर गॅस, एचपीसीएल, ‘निरी’, ‘ओएनजीसी’, ‘टाटा’, ‘आरसीएफ’, अग्निशमन दल आदी संबंधित प्राधिकरणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, पालिकेच्या कार्यक्षेत्रात कुठेही असा प्रकार घडल्यास कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या 1916 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
असा करणार तपास
गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी दुपारपर्यंत पालिकेकडे 34, पोलिसांकडे 106 आणि संबंधित गॅस कंपन्यांकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने खरोखरच गॅस गळती झाली का, नेमकी कुठे झाली, गळतीची कारणे कोणती याचा शोध घेतला जाणार आहे. यामध्ये आढळलेल्या कारणांच्या अनुषंगाने पुढील आवश्यक कार्यवाही केली जाईल.
11 प्रकारच्या गळतीचा तपास होणार
गॅस गळतीचे गूढ उकलत नसल्यामुळे इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मेटेओरॉलॉजी सायन्सच्या सहाय्याने 11 प्रकारच्या गॅस गळतीची तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, संबंधित समितीने आपला अहवाल 26 सप्टेंबर रोजी होणाऱया बैठकीत सादर करण्याचे निर्देशही पालिका प्रशासनाने दिले आहेत.























































