‘धनुष्यबाण’ हाच आपला उमेदवार! आदित्य ठाकरे यांचा शिवसैनिकांना कानमंत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. कोणाला कुठून तिकीट मिळणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी कोणाला कुठून तिकीट मिळणार यावर चर्चा करत बसू नये. ‘धनुष्यबाण’ हाच आपला उमेदवार असणार आहे. त्याच्या विजयासाठी मोठय़ा जोमाने कामाला लागा, असा कानमंत्र शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला. तसेच शिवसेनेने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहचवा, असे आवाहनही त्यांनी केले.

वरळी विधानसभेतील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा आज वरळीतील वाटुमल महाविद्यालयात मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी आदित्य ठाकरे बोलत होते. निवडणुका असोत अथवा नसोत शिवसेना आणि शिवसैनिक मोठय़ा हिमतीने काम करतो. त्यांच्याच जोरावर शिवसेनेने आतापर्यंतची यशस्वी वाटचाल केली असल्याचेही आदित्य यांनी सांगितले. तसेच आता आपल्याला नुसते घराघरात नव्हे तर प्रत्येकाच्या मनामनात पोहचायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वरळीत आता आपली ताकद दुपटीने वाढली आहे. जे याआधी आपल्यासमोर होते, ते आता आपल्या सोबत आले आहेत. त्यामुळे आता एकीने जनहिताची कामे करूया. ज्याला आपल्या मदतीची, सेवेची गरज पडेल त्याला नाव, गाव, भाषा, धर्म न विचारता केवळ मानवतेच्या भावनेतून काम करूया, असे आदित्य ठाकरे यांनी बोलताना सांगितले. या वेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, माजी राज्यमंत्री सचिन अहीर, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, विभाग संघटक किशोरी पेडणेकर, उपहापौर हेमांगी वरळीकर, नगरसेविका स्नेहल आंबेकर, नगरसेवक समाधान सरवणकर, अमेय घोले, अरविंद भोसले, संतोष खरात, दत्ता नरवणकर, श्री संकल्प प्रतिष्ठानच्या संचालिका संगीता अहीर, उपविभागप्रमुख हरीश वरळीकर, राम साळगावकर, उपविभाग संघटक विनीता चव्हाण, ज्योती दळवी, माजी नगरसेवक सुनील अहीर आदी उपस्थित होते.

शिवसेनेत स्किलबेस्ड इनकमिंग

शिवसेनेत कोणालाही घेतलं जात नाही. येथे केवळ स्किलबेस्ड इनकमिंग चालते. ज्याला घ्यायचे आहे त्याचे काम बघूनच प्रवेश दिला जातो, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका रत्ना महाले, अरुण मिश्रा यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मनसेच्याही अनेक कार्यकर्त्यांनी या वेळी शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेत प्रत्येकाला मान–सन्मान मिळणार

शिवसेना हा एक परिवार आहे. येथे प्रत्येक जण शिवसैनिक असतो. जुना-नवा असा कोणताही भेद नाही. जे शिवसेनेत आले त्यांना मान-सन्मान मिळणारच, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच सचिन अहीर आणि त्यांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने शिवसेनेत आले आहेत. पण ते आम्हाला परके नाहीत. कारण सचिन अहीर आणि शिवसैनिकांची काम करण्याची पद्धत एकच आहे. त्यामुळे ते वयाने नसले तरी कामाने ज्येष्ठ शिवसैनिकच आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.