
ह्युस्टनमधील ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात इस्लामिक दहशतवादाविरोधात एल्गार केल्यानंतर हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी न्यूयॉर्कमध्ये पर्यावरणरक्षणासाठी साद दिली. पर्यावरणावर आता बोलण्याची नाही तर कृती करण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले.
न्यूयॉर्कमध्ये जलवायू परिवर्तनावर आयोजित सत्रादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी पर्यावरणरक्षणासाठी सर्व देशांना कृती करण्याचे आवाहन केले. या वेळी त्यांनी हिंदुस्थानात प्लॅस्टिकविरोधात उभारलेल्या मोहिमेचे उदाहरण दिले. आम्ही पर्यावरणरक्षणासाठी ठोस पावले उचलली आहेत. सिंगल युज प्लॅस्टिकविरोधात अभियान हाती घेतले आहे. हिंदुस्थानप्रमाणे इतर सर्वच देशांनी आता कृती करण्याची गरज आहे. पर्यावरणावर केवळ बोलण्याची वेळ केव्हाच संपलीय. परिस्थिती गंभीर बनलीय. त्यामुळे आता पर्यावरण वाचवण्यासाठी ठोस कृतीची गरज आहे, असे प्रतिपादन मोदी यांनी केले.
अपारंपरिक ऊर्जास्रोतांवर भर
पंतप्रधान मोदी यांनी पारंपरिक ऊर्जास्रोतांऐवजी अपारंपरिक ऊजास्रोतांच्या वापराचे महत्त्व पटवून दिले. हिंदुस्थानने सौरऊर्जा निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. इतर देशांनीही हिंदुस्थानच्याच पावलावर पाऊल ठेवावे, असे आवाहन मोदींनी या वेळी केले.


























































