पावसाचा फूल शेतीला फटका; फूल उत्पादक शेतकरी अडचणीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सतत होत असलेल्या रिमझिम पावसाचा फटका अन्नधान्याबरोबच फूल शेतीलादेखील बसला आहे. रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे फूल शेतीचे नुकसान झाले आहे. जास्तीच्या पाण्यामुळे फुले काळी पडू लागली आहेत तर झेंडूच्या फुलांच्या आकारावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील फूल उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सण-उत्सवांच्या काळात फुलांची मागणी होईल, पण गुणवत्तेचा निकष लावून शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने विक्रेते फुले खरेदी करतील आणि स्वतःचे उखळ पांढरे करतील अशी स्थिती निर्माण झाली आहे.

जिह्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले. कमी कालावधीत आणि कमी पावसात येणारी ज्वारी-बाजरीचे उत्पन्न घेणेदेखील कठीण झाले. त्यामुळे काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी पालेभाज्या, फळभाज्यांबरोबरच फूल शेतीकडे आपला मोर्चा वळविला. धुळे तालुक्यातील रानमळा, दिवाणमळा, तिथी या शिवारातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून फुलाच्या उत्पादनास सुरुवात केली आहे. या गावांमधून गुलाब, निशिगंध, झेंडूच्या फुलांची लागवड केली जाते. यंदा उन्हाळय़ात पुरेसे पाणी नसल्याने फुलांची लागवड कमी झाली. जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी फुलांची लागवड केली. फुलांच्या रोपांची वाढदेखील चांगली झाली. परंतु श्रावण संपल्यानंतरदेखील रिमझिम पाऊस कायम राहिला. बराच काळ ढगाळ वातावरण कायम राहिले. त्याचा परिणाम फूल शेतीवर झाला आहे. फुले काळी पडू लागली आहेत. तसेच आकारमानदेखील कमी झाले आहे. झेंडूच्या फुलांचा आकार संकुचित झाला आहे. शिवाय रंगावर आणि टवटवीतपणावर परिणाम झाला आहे.

फुलांना काळसर रंगाची छटा आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. सध्या तरी पितृपक्ष असल्याने फुलांची मागणी घटली आहे. पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी या काळात फुलांची मोठय़ा प्रमाणात मागणी होईल, पण गुणवत्तेच्या नावावर फूल उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित दर दिला जाणार नाही, तर व्यापारी आणि विक्रेते नफेखोरी करतील अशी भीती आता शेतकरीच व्यक्त करू लागले आहेत. स्थानिक उत्पादनात घट आल्याने पुणे, नाशिक, नगर, चांदवड या भागांतून झेंडूच्या फुलांची आवक होईल. त्यामुळे ग्राहकांसाठी झेंडू महागलेला असेल, असे फूल विक्रेते राजेंद्र गवळे यांनी सांगितले.