बीडला पावसाने झोडपले, वीज पडून एकाचा मृत्यू; नदी नाल्यांना पूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळा संपत आलेला असताना पावसाला लहर आली. बीड शहरासह पाच महसूल मंडळाला पावसाने अक्षरश: झोडपले.  बीड तालुक्यात १४० मि.मी.पावसाची नोंद झाली. शहरातील संपूर्ण रस्ते पाण्याखाली होते. मध्यरात्री अनेक दुकानामध्ये पाणी घुसले, शिवाजीनगर पोलीस स्टेशन अक्षरश: पाण्यामध्ये होते. जोरदार  पावसाने बीड आणि वडवणी तालुक्यामध्ये घरांचे पडझड झाली. बिंदूसरा धरण निम्म्यावर आले. असंख्य बंधारे काटोकाट भरले. वीज पडल्याने तेलगावजवळ लोनवळ तांडा येथे प्रविण दत्ता राठोड यांचा वीज पडल्याने मंगळवारी दुपारी मृत्यू झाल्याची घटना घडली. तर वडगाव येथे चार बैल भाजले गेले.

सोमवारी रात्री उशिरा बीड  जिल्ह्यात पावसाने दाणादाण उडवून दिली. पाच महसूल विभागामध्ये तर अतिवृष्टी झाली. बीडमध्ये १४० मि.मी.पाऊस झाला. राजुरीमध्ये ११५ मि.मी., नाळवंडीत ५३, पिंपळनेर ४०, पाली ११०, म्हाळसजवळा १४५, आष्टी तालुक्यातील धामणगाव ४३, दौलावडगाव ६७, पिंपळा २६, शिरूर ३४, वडवणी ५२, कवडगाव ९५, माजलगाव तालुक्यातील तालखेड ५०, केज तालुक्यातील पिंपरी ४०, परळी तालुक्यातील धर्मापुरी ३८ या मंडळामध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली. मध्यरात्री पुन्हा जोरदार पावसाला सुरूवात झाली. पहाटेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. रात्री साडेआठला पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बीड जिल्ह्यात ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसास सुरूवात झाली. धुवॉधार पाऊस पडल्याने बीड शहर पाणीमय झाले. अनेक दुकानामध्ये पाणी घुसले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाणी घुसल्याने पोलीस प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. छोटे,  मोठे बंधारे खचाखच भरले. बिंदूसरा नदीला पहिल्यांदाच पूर आला. कर्परा आणि सिदफणा नदीलाही पूर आला. बिंदूसरा धरण रात्रीच्या पावसाने निम्म्यावर आले. मंगळवारी वीज पडल्याने तेलगावजवळ एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर सोमवारी रात्री वीज पडल्याने वडगाव येंथे चार बैल भाजल्या गेले. वडवणी तालुक्यामध्ये घरांची  पडझड झाली.

एकीकडे पाच महसूल मंडळात अतिवृष्टी आणि दहा महसूल मंडळात समाधानकारक पाऊस झालेला असताना बीड  जिल्ह्यातील उर्वरित आष्टी, पाटोदा, गेवराई, शिरूर, अंबाजोगाई, माजलगाव, केज, धारूर, परळी तालुक्यातील  महसूल  मंडळामध्ये अजुनही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. हे सर्व पाणी माजलगाव धरणामध्ये पोहचणार असल्याने बीड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी उसंत मिळाली आहे.