
#MahaElection विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा सुरू आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा ठामपणे सांगितले. युतीची घोषणा लवकरच होईल, असा विश्वासही त्यांनी पुढे व्यक्त केला.
भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. महायुतीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, भविष्याचा अभ्यास मी कॉलेजमध्ये शिकत असताना करायचो, पण आता गॅप पडली. त्यामुळे भविष्य सांगणे सोडले आहे. मात्र युतीची घोषणा लवकरच होईल. कारण शिवसेना व भाजपच्या नेत्यांमध्ये महायुतीची चर्चा योग्य दिशेने सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युतीची घोषणा लवकरच करतील, असेही ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत महायुती 220 पेक्षा अधिक जागा मिळवेल असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता महायुती 220 पेक्षा अधिक जागा मिळवेल ही घमेंड नाही तर आत्मविश्वास आहे. आम्हाला 220 पेक्षा अधिक जागा मिळतील. तुम्ही आजची वेळ व तारीख लिहून ठेवा, असे ते म्हणाले.
सहयोगी पक्षांच्या चर्चेनंतर
नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशाबाबत त्यांना विचारले असता त्यांनी या प्रश्नावर थेट उत्तर देण्याचे टाळले. पण भाजप हा पक्ष आपल्या सहयोगी पक्षांशी चर्चा करून निर्णय घेणारा पक्ष आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून नारायण राणेंबाबत निर्णय घेतील असे त्यांनी स्पष्ट केले.
अमित शहा यांचा मुंबई दौरा रद्द
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री अमित शहा गुरुवार, 26 सप्टेंबर रोजी मुंबईत येणार होते. पण त्यांचा हा दौरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोनच दिवसांपूर्वी शहा मुंबईत येऊन गेले. गोरेगाव येथे झालेल्या कार्यक्रमात कलम 370 च्या मुद्दय़ावर मार्गदर्शन करत हा विषय निवडणुकीच्या निमित्ताने घराघरात घेऊन जा असे आवाहन केले होते. त्यानंतर शहा हे पुन्हा लगेचच मुंबई दौऱयावर येणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.






























































