
हिंदुस्थानच्या खेळाडूंनी बंगळुरूत मंगळवारपासून सुरू झालेल्या आशियाई एज ग्रुप चॅम्पियनशिप या जलतरण शर्यतीत नेत्रदीपक कामगिरी केली. यजमान संघाच्या जलतरणपटूंनी सहा सुवर्ण, सहा रौप्य व पाच कास्य पदकांसह एकूण 17 पदकांची लयलूट करीत पहिला दिवस गाजवला. कुशाग्र रावत याने 200 मीटर आणि 800 मीटर फ्रिस्टाईल शर्यतीत गोल्ड मेडल जिंकत हिंदुस्थानसाठी मोलाची कामगिरी बजावली. बंगळुरू येथील पडुकोण-द्रविड सेंटर ऑफ स्पोर्ट्स एक्सिलेन्समध्ये ही स्पर्धा सुरू आहे.
कुशाग्र रावतने 1.52.30 सेंकद अशा वेळेसह पुरुषांची 200 मीटर फ्रिस्टाईल जलतरण शर्यत पूर्ण करीत सुवर्ण पदक जिंकले. त्यानंतर त्याने 800 मीटर फ्रिस्टाईल जलतरण शर्यत 8.10.05 सेंकद अशी वेळ देत पूर्ण करीत आणखी एका सुवर्ण पदकाला गवसणी घातली. हिंदुस्थानच्या संघाने 4 बाय 100 मीटर फ्रिस्टाईल जलतरण शर्यतीत 3.23.72 सेंकद अशा वेळेसह शर्यत पूर्ण केली आणि पहिल्या स्थानावर झेप घेतली. शोन गांगुलीने 200 मीटर मुलांच्या शर्यतीत 2.11.18 सेंकद अशा वेळेसह शर्यत पूर्ण करीत हिंदुस्थानला महत्त्वपूर्ण गोल्ड मेडल जिंकून दिले.
श्रीहरी नटराजने 50 मीटर बॅकस्ट्रोक शर्यत 25.30 सेंकदात पूर्ण करीत हिंदुस्थानला पाचवे गोल्ड मेडल पटकावून दिले. महिलांच्या 50 मीटर बॅकस्ट्रोक जलतरण शर्यतीत माना पटेल हिने 29.92 सेंकद अशा वेळेसह बाजी मारली आणि देशाला दिवसातील सहावे गोल्ड मेडल जिंकून दिले.



























































