योगेश्वर दत्त भाजपमध्ये प्रवेश करणार, विधानसभा लढवण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. योगेश्वरने बुधवारी हरयाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांची भेट घेतली. यानंतर योगेश्वर भाजपकडून हरयाणामध्ये विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासोबत हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या. महाराष्ट्राप्रमाणेच हरयाणामध्ये 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने सुभाष बराला यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्याने आपण हरयाणा पोलीस दलाचा राजीनामा दिल्याची माहिती त्यांना दिली. यामुळे त्याच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या उठल्या आहेत.

या संदर्भात योगेश्वर दत्त किंवा भाजपकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र 2012 मध्ये ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या योगेश्वरला लोकसभा निवडणुकीवेळीच तिकीट देण्याचा निर्णय भाजपने घेतला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा नाही तर आता विधानसभा निवडणूक तो भाजपकडून लढेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याला सोनीपतमधील विधानसभा मतदारसंघाचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे.