
>> नमिता वारणकर
उत्तम अभिनयाच्या अदाकारीने गाजलेली दर्जेदार नाटय़कलाकृती ‘हिमालयाची सावली’… नव्या संचात रसिकांसाठी रंगभूमीवर तब्बल चाळीस वर्षांनंतर पुन्हा सादर होत आहे. या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग रविवारी, 29 सप्टेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त अभिनेते शरद पोंक्षे यांच्याशी साधलेला संवाद…
‘हिमालयाची सावली’ या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा रंगभूमीसाठी सज्ज झाला आहात. काय भावना आहेत, असे विचारता अभिनेता शरद पोंक्षे सांगतात, ‘नथुराम’चे प्रयोग बंद करू नका, अशी प्रेक्षकांची विनंती होती. तेव्हा त्यांना मी शब्द दिला होता की, चांगलं नाटक घेऊन परत येईन. तो शब्द मी आता पाळलाय. रसिकांनी माझ्या नाटकातल्या, चित्रपटातल्या, मालिकेतल्या भूमिकेवर भरभरून प्रेम केलं. तसंच प्रेम या नाटकावरही करावं,अशी माझी रसिकांना कळकळीची विनंती आहे. एका म्हाताऱया माणसाचं काम करण्याचा प्रयत्न यामध्ये केलाय. तसेच पुन्हा रंगभूमीवर काम करण्याची संधी मिळतेय. तेही एका मोठय़ा नाटकासाठी. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.
कमी बोलून जास्त भाव व्यक्त करणारी ही भूमिका आहे. या व्यक्तिरेखेत दोन टोकं आहेत. बायको सगळं भडाभडा मनातलं बोलून मोकळी होते. कधी काही मनात ठेवत नाही आणि नानासाहेब सगळं मनात साठवून ठेवतात. हे मोठं अवघड काम आहे. दुसरं म्हणजे व्यक्तिरेखेचं वय सत्तरीचं आहे. शिवाय कमी संवादात ती साकारणं हे त्यांच्या या नाटकातील भूमिकेचं वैशिष्टय़ आहे.
गाजलेल्या अनेक कलाकृती रंगभूमीवर येत असतात. हिमालयाची सावली नव्या संचात सादर होतंय. तर याचं वेगळेपण काय, यावर त्यांचं म्हणणं आहे, वसंत कानेटकर असं म्हणाले होते की, माझ्या सगळ्या नाटकांमध्ये मला सगळ्यात जास्त आवडलेलं हे नाटक आहे. त्यानंतर आम्ही हे शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न केला आहे. काही जुनी नाटकं रंगभूमीवर येऊन गेली. तसं या नाटकाच्या बाबतीत कधी झालं नाही. कानेटकरांची भाषा ,पूर्वीचा जुना काळ या नाटकात रसिकांना पाहायला, अनुभवायला मिळेल. तसेच शृजा आणि राजेशबरोबर काम करताना मजा येते. राजेशने या नाटकातील काळ, भाषा आणि माणसं यांचा सखोल अभ्यास केला. त्यामुळे त्याला ते आमच्याकडून करवून घेणं सोपं झालं. नाटकातील नवीन मुलांकडून ती भाषा बोलून घेण्याची जबाबदारी त्याने लीलया पेललेली आहे. महत्त्वाचे म्हणजे शृजाबरोबर काम करताना जाणवलं की, तिचं आणि माझं त्या व्यक्तिरेखेचं वय नाही, मात्र आम्ही भूमिका केल्या आहेत. तिनेही प्रचंड मेहनत घेतली आहे, असा अनुभव ते सहकलाकारांविषयी व्यक्त करतात.
नाटक का पाहावं ?
प्रेक्षकांनी आवर्जून नाटकाला यावं. नाटक पाहावं. तो काळ अनुभवावा. ही सगळी माणसं हिमालयासारखी आहेत. अशी माणसं आजही आहेत. प्रत्येक काळात असणार आहेत. त्यांच्या सावल्या म्हणजे त्यांचे कुटुंबीय. त्या सगळ्यांनासुद्धा त्यांच्या मोठेपणाचे चटके कसे बसतात, त्यांचं वैवाहिक जीवन कसं असतं, आपले वडील असे आहेत, नवरा असा आहे, त्यांनी संपूर्ण वेळ समाजाला वाहून घेतलं आहे. त्यांच्यासाठी संपूर्ण समाज हेच त्यांच्यासाठी कुटुंब आहे. एका वेळेला त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं. हे या नाटकात घडतं. या सगळ्या गोष्टी रसिकांनी बघाव्यात समजून घ्याव्यात, तसेच हे कुणाची तरी साथ मिळाल्याशिवाय माणसं मोठी होत नाहीत हे सारं जाणून घेण्याकरिता हे नाटकं पाहावं, असे ते रसिकांना आवाहन करतात.





























































